no images were found
शहराचा विकासकामात कोणी राजकारण आणू नये – क्षीरसागर
कोल्हापूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून जवळपास तीन वर्षे झाली. मात्र अजूनही काही माजी नगरसेवक हे महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत. विकास योजनेत कोणी राजकीय अडथळा आणून काम थांबवण्याचा खटाटोप केला तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. चुकीच्या पद्धतीने कोणी प्रेशर टाकत असेल तर त्याला बळी पडू नका.”अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. शहराचा विकासकामात कोणी राजकारण आणू नये असेही क्षीरसागर यांनी आवाहन केले.
कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, विकसक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत बोलताना क्षीरसागर यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, कचरा उठाव व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. गांधी मैदान सुशोभीकरण, रंकाळा तलाव सुशोभीकरण यासंबंधी ही चर्चा झाली. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करतो अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. येत्या दोन महिन्यांमध्ये ५०० हून अधिक रोजंदारी कर्मचारी हे कायम सेवेत होतील यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. कोल्हापूर शहराला रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची वर्क ऑर्डर काढली असल्याचे प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. प्राधान्यक्रमाने सोळा रस्त्यांची कामे होणार आहेत. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शहर अभियंताच्या नेतृत्वाखाली चारही विभागाच्या उपअभियंतावर जबाबदारी सोपवले आहे असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा दहा जानेवारी पर्यंत होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने शहरातील विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करावी. महापालिकेची यंत्रणा म्हणावी तशी योग्य दिसत नाही. यंत्रणा आणखी सक्षम करावी लागेल. शहराच्या रस्ते कामासाठी आणखी ९० कोटी मंजूर आहेत, येत्या आठ दिवसांमध्ये निधी उपलब्ध होईल. विकास कामे करताना कोणी आडवे येत असेल तर त्याला घाबरायचे कारण नाही. विकास कामात खोडा घालण्याची प्रवृत्ती काही जणांची आहे. काम थांबवण्यासाठी काहीजण तक्रारी करत असतात. त्यांच्या दबाव खाली येऊन काम थांबवण्याएऐवजी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करावी. चुकीच्या पद्धतीने प्रेशर टाकत असेल तर त्याला बळी पडू नका. विकास कामात राजकारण होता कामा नये. सत्याचा आधार घेऊन कामे करा. टेंडरमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कामकाज झाले पाहिजे. काही नगरसेवक अजूनही महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत. सभागृहाची मुदत संपून तीन वर्ष झाली. आता प्रशासक आहेत. महायुतीची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी महायुती सरकार निधी उपलब्ध करून देते. साहजिकच त्याकामाचे श्रेयही सत्ताधारी मंडळी घेणार. थेट पाईपलाईन योजनेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व मी, प्रयत्न केले आहेत हे जनतेला ही ठाऊक आहे. मात्र काहीजण विनाकारण स्टंटबाजी करत आहेत. राजकारणात प्रत्येकाने सभ्यता पाळली पाहिजे.”असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.
महापालिकेत मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विषय आहे. यासह कोल्हापूर महापालिका व शहराशी निगडित जे विषय आहेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ असेही क्षीरसागर यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्ते कामावरून टीका केली होती. त्या टिकेचाही क्षीरसागर यांनी समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले, “त्यांच्या टीकेला अर्थ नाही. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी आमचा प्राधान्यक्रम आहे. टीका करणाऱ्यांना शहराचा विकास, विकासकामासाठी निधी आणणे या गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टिकेला किंमत देत नाही..”
शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची माहिती दिली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत अडसूळ, कंत्राटदार अरुण पाटील, अशोक भोसले, परिवहन समितीचे माजी सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे अजित सासणे आदी उपस्थित होते.