no images were found
हद्दवाढीसाठी कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील केएमटीचे तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीच्या वतीने केएमटीच्या बुद्ध गार्डन येथील वर्कशॉप समोर पहाटे पाच वाजल्यापासून बस रोखून धरल्या आहेत. पहाटे केएमटीचे कोणीही अधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी अखेर ठिय्या मारला आणि शहरातली बससेवा ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीकडून केएमसाठीचे तोट्यातील रस्ते बंद करण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत असून अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी टप्प्याटप्प्याने मार्ग बंद केले जातील असे आश्वासन आंदोलकांना दिले. पण तोट्यातील मार्ग बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हद्दवाढ कृती समितीने केला त्यामुळे हा वाद चिघळला आहे. त्यामुळे आज शहरवासियांना फटका बसला आहे.
या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर हद्दवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा याआधीच कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने दिला होता. त्यानुसार आज सकाळीच आंदोलन करत केएमटी वर्कशॉपबाहेर निदर्शनं करत हद्दवाढीस विरोध करणाऱ्या गावातील केमटी बस सेवा थांबवण्यात आली आहे.
ज्या गावांकडून हद्दवाढीसाठी विरोध करण्यात येत आहे अशा गावांतील बससेवा रद्द करण्यात यावी अशी मागणी कृती समितीकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली नसल्याने बस रोखणार असल्याचा इशारा कृती समितीचे बाबा इंदुलकर यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांना पत्रकाद्वारे माहिती दिली होती. के एम टी चे 24 पैकी 22 तोट्यातील रूट बंद झालेच पाहिजे अश्या आशयाचे बोर्ड हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे. तोट्यातील रूटवर केमटी धावत असल्याने महिन्याला 1 कोटी 65 लाख रुपयाचा तोटा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. एकूणच परिस्थितीवरून हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा तापणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.