no images were found
तुंम्ही सर्व मुली भावी काळातील तारा आहात – के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : तुंम्ही सर्व मुली भावी काळातील तारा आहात, तुंम्ही खूप मोठे होऊन, शिकून जगामध्ये ताऱ्यांसारखे चमकावे असे प्रतिपादन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी किशोरी मेळाव्यात केले. महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील मुलींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी “तारा-हितगुज तरुणाईचे” या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हा किशोरी मेळावा गंगावेश जवळील केएमसी कॉलेजमध्ये घेण्यात आला. या किशोरी मेळाव्याचे उद्घाटन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी रोपास पाणी देऊन केले.
प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी “तारा- हितगुज तरुणाईचे” या अभियाना अंतर्गत मार्गदर्शन करताना मुलींना असे काही प्रश्न असतील जे कोणाशी त्या बोलू शकत नाहीत किंवा शेअर करु शकत नाहीत अशा प्रश्नांची उत्तरे तुंम्हाला या किशोरी मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहेत. मुलींच्या रक्त वाढीसाठी कोणकोणत्या पोषक आहाराची गरज आहे. याची माहिती या मेळाव्यात मिळेल. तसेच मुलींनी स्व-सुरक्षेसाठी सेल्फ डिफेन्सबाबत काही कोर्सेस घेता येतील का याबाबत आपण नियोजन करु असे सांगितले.
पोलिस निरिक्षक पुष्पलता मंडले यांनी बोलताना गुड टच बॅड टच (चांगला स्पर्श व वाईट स्पर्श) याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तसेच मुलींनी एखाद्या परिस्थीमध्ये सक्षम व धाडसी होऊन परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. सध्या मोबाईलचा वापर वाढला असल्याने त्याचा योग्य वापर कसा करावा व सोशल मिडीयावरील माहिती फक्त आपल्या हिताच्या दृष्टीने योग्य ती वापर करावी. सोशल मिडीयावर आपले वैयक्तिक फोटो किंवा माहिती शेअर करु नयेत याबद्दल त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी बोलताना मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगून पुढील वाटचालीसाठी मुलींना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालयामध्ये मुलींसाठी तारा-हितगुज तरुणाईचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असलेचे सांगितले. स्त्रीरोग तज्ञ डॉ.मंजुळा पिशवीकर यांनी किशोर वयीन मुलींच्या वयात होणारे बदल व मासिक पाळी संदर्भात स्लाईड शोद्वारे मुलींना मार्गदर्शन केले.
शहरातील मुलींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिका शाळा, केएमसी कॉलेज व खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुंलीची रक्त तपासणी, कॅलशिअम, वजन, उंची तपासणी व मासिक पाळी या संदर्भात या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरातील महापालिका व खाजगी शाळेतील 500 मुलींची उपस्थिती होती. या मेळाव्यात प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रं.4 अंतर्गत 266 मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. उर्वरीत मुलींची आरोग्य तपासणी त्यांच्या शाळेमध्ये जाऊन करण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण विभागामार्फत आरोग्य तपासणी कार्ड तसेच गुळ शेंगदाणा चिक्की, राजगीरा लाडू, चांगला स्पर्श वाईट स्पर्श, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छते संदर्भातील सवयी याबाबतचे माहिती पत्रके उपस्थित सर्व मुलींना वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सारीका पाटील व सोनाली मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षीका उषा सरदेसाई यांनी केले. यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूश्री रोहिदास, वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपाली यादव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य अरुण पौडमल, अधीक्षक सौ.प्रिती घाटोळे आदी उपस्थित होते.