no images were found
महानगरपालिकेच्या खाद्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दिन.अ.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत ताराबाई पार्क जवळील सासने मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या शुभहस्ते फित कापून या खाद्य महोत्सवाचा शुभारंभ सायंकाळी करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, महिला व बालकल्याण अधिक्षक प्रिती घाटोळे उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये महिला बचतगटांनी बनविलेल्या खाद्य पदार्थांचा 50 प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा-पांढरा रस्सा, चिकन 65, खांडोळी, नॉनव्हेज रोल, मटण लोणचे, गार्लिक चिकन, रक्तीमुंडी, सर्व प्रकारची लोणचे, आंबोळी, दावणगिरी डोसा, झुणका भाकर, वडापाव, पकोडे, व्हेजरोल, पाणी पुरी, पिझ्झा, सॅण्डविच, थालीपीठ, घरगुती बिस्किट, सर्व प्रकारचे लाडू व इतर बरेच काही पदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खावयास मिळणार आहेत.
हे स्टॉल लावण्यासाठी निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, स्वाती शहा व अंजली सौंदलगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्टॉलला नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी केली असून मुलांनी या ठिकाणच्या विविध प्रकारच्या गेमचा आनंद घेत जल्लोष केला. तरी या स्टॉलला नागरीकांनी भेट देऊन या खाद्य महोत्सवातील विविध पदार्थांचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील प्रदर्शनात कोल्हापूरच्या दुर्गादेवी महिला बचतगटाची निवड
नवी दिल्ली येथील प्रगती विनकाम, कारागीर, लघु व सुक्ष व्यवसायिक यांच्या उत्पादनासाठी आयोजित प्रदर्शनात कोल्हापूर महानगरपालिकेच्या दुर्गादेवी महिला बचतगटाची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये पुर्ण भारतातून साधारण 150 बचतगट आणि त्यांची उत्पादने घेऊन बचतगट सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातून 5 ते 6 बचतगट पात्र झाले आहेत. त्यापैकी दुर्गादेवी महिला बचतगटांची निवड झाली आहे. या बचत गटामार्फत कोल्हापूरी चप्पलचे स्टॉल लावण्यात येणार आहे.