no images were found
पाटगावचा मध सर्वदूर पोहोचवा -श्रीकांत जौंजाळ
कोल्हापूर : मध उत्पादन व विक्री बरोबरच पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधणाऱ्या पाटगावचा अभ्यास करुन इथला मध सर्वदूर पोहोचवण्यासाठी पत्रकारिता विद्यार्थ्यांनी सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने “मधाचे गाव पाटगाव” बाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होत्या.
जौंजाळ म्हणाले, पाटगाव परिसरात मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 1 कोटी 49 लाख 82 हजार रुपयांचा निधी वितरित केला असून 31 लाख 71 हजार रुपये निधीतून या ठिकाणी विकास कामे होत आहेत. या निधीतून पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरातील मधमाशापालन उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. विविध विभाग व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मध उद्योगाद्वारे या भागाचा कायापालट केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरलेल्या पाटगावचा विकास हा रुरल टुरिझम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या देश पातळीवरील संस्थेच्या वतीने वर्षभर करण्यात येणार आहे.
वृषाली पाटील म्हणाल्या, डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे वनउपजांतून गावाची सर्वांगीण प्रगती साधत आहे. शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाटगाव परिसरात मध उत्पादनाबरोबरच अन्न प्रक्रिया उद्योग, होम स्टे व हॉटेलिंगच्या माध्यमातून पर्यटनपूरक व्यवसायांना चालना देण्यात येत आहे. मध निर्मिती, विक्री व पर्यटन पूरक व्यवसायाद्वारे देशपातळीवर नावलौकिक घडवणाऱ्या पाटगावची ओळख विविध माध्यमांच्या सहकार्याने लवकरच जगभरात पोहचेल.
डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. मध निर्मितीचे टप्पे, आधुनिक तंत्राचा वापर, मिळणारे उत्पादन, भविष्यातील नियोजन, प्रशिक्षण आदी विषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जौंजाळ यांनी सविस्तर उत्तरे दिली. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.