no images were found
देशभरात कर्करोगाची लवकर तपासणी आणि जनजागृतीसाठी संजीवनी २०२५ मोहीम सक्रिय
अभिनेत्री विद्या बालन ‘संजीवनी’च्या पुरस्कर्त्या;
मुंबई, : भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने या संकटाला सामोरे कसे जावे, या विषयावर चर्चा करण्यासाठी फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, न्यूज18 नेटवर्क आणि ज्ञानसहभागी टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी राष्ट्रीय परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली. परिषदेच्या या तिसऱ्या पर्वात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, शासन, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्र यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. २०२५ या वर्षभरात देशातील कर्करोग रुग्णांची संख्या १५.७ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यातील सुमारे ७० टक्के रुग्णांचे निदान अजूनही उशिराच्या टप्प्यावरच होत असल्याने, या परिषदेचा केंद्रबिंदू जागरूकतेपलीकडे जाऊन वेळेवर कृती करण्यावर होता.
संजीवनी मोहीम गेल्या सातशेहून अधिक दिवसांमध्ये अधिक प्रभावी आणि बहुआयामी झाली आहे. न्यूज18च्या टीव्ही नेटवर्कद्वारे ६० कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलेली ही मोहीम १.३ कोटींहून अधिक जणांशी डिजिटल संवाद साधण्यात यशस्वी ठरली. या मोहिमेच्या प्रत्यक्ष पातळीवरील उपक्रमांमध्ये कर्करोग तपासणी शिबिरे, शालेय कार्यशाळा, कॉर्पोरेट आरोग्य कार्यक्रम आणि कर्करोगातून बरे झालेल्यांच्या अनुभवकथा मांडणे यांचा समावेश आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि संजीवनी मोहिमेच्या प्रचारक विद्या बालन यांच्यासाठी ही मोहीम अत्यंत वैयक्तिक आहे. परिषदेच्या मंचावर सर्व वयोगटातील कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांसोबत उभ्या राहून त्या म्हणाल्या, “आपण आपल्या आरोग्याची, सुखाची किंवा कल्याणाची काळजी फक्त मोठी अडचण किंवा आजार आल्यावरच घ्यायला लागतो, हे चुकीचे आहे. संकटाची वाट न बघता आधीपासूनच स्वतःची काळजी घ्यायला हवी. कर्करोग हा फक्त शरीरावर परिणाम करत नाही, तर तो आपले व्यक्तिमत्त्व, आपला आत्मविश्वास आणि कुटुंब यांनाही हादरवतो. त्याचे वेळेवर निदान झाल्यास त्याला तोंड द्यायला आपल्याला शक्ती मिळते, वेळ मिळतो आणि आशाही मिळते.” स्वतःला स्वीकारण्याची आणि समाजाशी जोडले जाण्याची जी परिवर्तनकारी ताकद आहे, त्याबद्दलही विद्या बालन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या परिषदेतील सर्वाधिक लक्षवेधी क्षणांपैकी एक होता ‘अंतरात्मा’ हा विशेष रॅम्प शो. यात कर्करोगातून बरे झालेल्यांनी भाग घेतला होता. या व्यक्ती केवळ आजारावर मात करून थांबल्या नाहीत, तर त्या पुन्हा व्यावसायिक, पालक, शिक्षक आणि सर्जक म्हणून आयुष्य जगू लागल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीने हा ठाम संदेश दिला की, कर्करोगावर मात करणे ही कहाणीची शेवटची पायरी नसून नव्या, अधिक सामर्थ्यवान प्रवासाची सुरुवात आहे. आरोग्यसेवेतील सहज उपलब्धता आणि सातत्यपूर्ण उपचार यांच्या बरोबरीने कर्करोगाच्या रुग्णांना मान-सन्मानाने, आदराने वागवणेही तितकेच आवश्यक आहे, हे य़ा व्यक्तींनी विशेष नमूद केले.
परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “फेडरल बँक, न्यूज18 नेटवर्क आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील ही भागीदारी खरेच प्रशंसनीय आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रात तसेच देशभरात वाढत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तातडीने सामूहिक कृतीची गरज आहे. ‘संजीवनी’सारख्या उपक्रमांतून दिसून येते की सरकार आणि समाज यांनी मिळून काम केल्यास विलक्षण परिणाम साध्य होतात. कर्करोगाचा प्रतिबंध आणि उपचार यांसाठी केंद्र व महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहेत. सध्या आठ डे-केअर सेंटर्समधून रेडिएशन आणि केमोथेरपी सेवा दिल्या जात असून, नागरी रुग्णालयांमध्ये आणखी २६ केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. ४ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले आरोग्य मोहीम सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील तब्बल २.५ कोटी महिलांची स्तन, तोंड व गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे रोगाचे लवकर निदान आणि त्यावर वेळेत उपचार शक्य झाले आहेत. सार्वजनिक जनजागृती आणि लोकसहभाग ही या लढ्यातील महत्त्वाची शस्त्रे आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की या मोहिमेत सामील व्हा, तपासण्यांसाठी लोकांना प्रोत्साहित करा आणि जीव वाचवा.”
फेडरल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही.एस. मणियन म्हणाले, “संजीवनीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत आम्हाला २०,००० हून अधिक रुग्णांपर्यंत पोहोचता आले आणि यावर्षी आणखी २०,००० लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना आधार देणारी मोहीम म्हणून सुरुवात झालेला हा उपक्रम आज अधिकाधिक रुग्णालये, ऑन्कॉलॉजी विभाग, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आदींचा समावेश करून सतत विस्तारत आहे. त्यायोगे रुग्णांना मदत मिळते आणि निरोगी लोकांमध्ये लवकर निदानाद्वारे आजाराची सुरुवात रोखता येते. आम्ही केवळ वैद्यकीय आधारच देतो असे नव्हे, तर रुग्णांचा प्रवास, त्यांचे राहणे आणि दैनंदिन जगण्यातील इतर अदृश्य ओझी हलकी करण्यावरही काम करू इच्छितो. ‘फेडरल बँक हॉरमिस फाउंडेशन’मध्ये आमचा विश्वास आहे की आरोग्यावर होणारा खर्च हा वायफळ नसतो, तर देशाच्या आर्थिक ताळेबंदातील ती एक गुंतवणूक असते. बँकेच्या सीएसआर फाउंडेशनचे ‘रिश्ता आप से है, सिर्फ अॅप से नहीं™️’ हे घोषवाक्य असंख्य कुटुंबे आपल्या अनुभवांतून खऱ्या अर्थाने जगत आहेत. नवोपक्रम आणि करुणा, भागीदारी आणि परिणामकारकता, तसेच आशावाद आणि कृती यांचा संगम घडवून एक अधिक निरोगी, अधिक सक्षम भारत घडवण्याचा आमचा संकल्प आहे. मी खूप आशावादी आहे, कारण एखादे राष्ट्र जेव्हा प्रगतीसोबतच करुणेलाही महत्त्व देते, तेव्हा आपण असंख्य जीव वाचवू शकतो आणि असंख्य जणांचे भविष्य सुरक्षित करू शकतो.”
‘टाटा ट्रस्ट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा म्हणाले, “गेल्या अनेक दशकांपासून ‘टाटा ट्रस्ट्स’ने देशाच्या कर्करोगविरोधी लढ्यात महत्वाचे कार्य केले आहे. प्रत्येक रुग्णाला परवडणारी, दर्जेदार आणि करुणापूर्ण उपचारसेवा मिळावी, ती कोणत्याही विशेषाधिकारापुरती मर्यादित नसावी, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन आणि ‘न्यूज18 नेटवर्क’सोबतच्या भागीदारीतून दिसून येते, की विविध स्वरुपाचे, पण समान ध्येय असलेले घटक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा व्यापक पातळीवर जीवन बदलता येते. अजूनही कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त जणांचे निदान उशिरा होत असल्याने, लवकर तपासणी ही फक्त वैद्यकीय गरज राहिलेली नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी झाली आहे. ती पार पाडण्यासाठी आपला सामूहिक निर्धार आवश्यक आहे. जनजागृती आणखी व्यापक करून आणि टिकाऊ आरोग्यव्यवस्था उभारून आपण भारताच्या आरोग्यकथेला नव्याने आकार देऊ शकतो. ही केवळ एक मोहीम नाही, तर जीव वाचवण्याची आणि भविष्य घडवण्याची एक धाडसी राष्ट्रीय शपथ आहे.”
‘नेटवर्क18’चे (ब्रॉडकास्ट) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘ए+ई नेटवर्क्स’चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश कौल म्हणाले, “धैर्याला बळ देणे आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या बाबींना वाचा फोडणे ही ‘नेटवर्क18’मध्ये आमची भूमिका आहे. फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, टाटा ट्रस्ट्स आणि आमच्या मोहिमेच्या दूत विद्या बालन यांच्या सहकार्याने संजीवनी चळवळ कर्करोगविरुद्धच्या लढ्यात रुग्ण आणि समाज या दोघांनाही केंद्रस्थानी आणत आहे. काही चुकीच्या समजुती मोडून, रोगनिदान लवकर करण्याला प्रोत्साहन देऊन आणि तपासणी करण्याला सामूहिक जबाबदारी बनवून आम्ही या जागरूकतेचे कृतीत रुपांतर करीत आहोत. ही केवळ दानधर्माची बाब नाही, तर ही न्याय, एकात्मता आणि कर्करोगसेवेचे नवे परिमाण घडवण्याची सामूहिक बांधिलकी आहे. एका धाडसी स्वरुपाच्या संवादातून ती आलेली आहे.”
बीयावर्षी कर्करोग तपासणी आणि रोगप्रतिबंध यांना देशभरातील दैनंदिन आरोग्यप्रक्रियेचा भाग बनविण्याचे ‘संजीवनी’चे नियोजन आहे. ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये समुदायांचा सहभाग आणि थेट जनसंपर्क मोहिमा यांच्या माध्यमातून याचा विस्तार केला जाणार आहे. वर्तनात बदल घडवणे, कर्करोगाविषयीची भीती व गैरसमज दूर करणे, खुल्या संवादाला प्रोत्साहन देणे आणि नियमित तपासणीद्वारे लवकर निदान करून घेणे, यांवर या उपक्रमाचा मुख्य भर असणार आहे. शाळेत जाणाऱ्या मुली, रोजंदारीवरील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील महिला हे या मोहिमेचे प्रमुख लक्ष्य आहेत. रोगाचे लवकर निदान ही नवी ‘सवय’ समाजात रूढ व्हावी, कर्करोगाला कलंक मानला जाऊ नये आणि अखेरीस देशभरातील हजारो जीव वाचावेत, हे ‘संजीवनी’चे स्पष्ट ध्येय आहे. इतर संस्थांशी भागीदारी करण्याचा उद्देश हा केवळ या मोहिमेचा पोहोच वाढवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील सहभाग दृढ करण्यासाठी आहे.
‘संजीवनी’च्या माध्यमातून कर्करोगाविरुद्ध भारत एकत्र उभा राहत असताना, ही चळवळ प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की आरोग्य तपासणी ही आयुष्याचा अत्यावश्यक भाग म्हणून प्रत्येकाने स्वीकारावी; असे भविष्य घडवावे, जिथे लवकर निदान हीच नवी पद्धत असेल आणि रोज नवे जीव वाचतील. ‘संजीवनी’चा खरा ठसा हा आकडेवारीत किंवा घोषणांत नाही, तर एका नव्या सामाजिक करारात आहे. त्यात अशी हमी आहे, की जागरूकता, कृती, सहानुभूती आणि भागीदारी यांच्या जोरावर कर्करोगाची कथा ही ‘भीती आणि हानी’वरून ‘स्वाभिमान, जगणे आणि नवी आशा’ यामध्ये आपण बदलू शकतो. प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे, प्रत्येक कहाणी महत्त्वाची आहे आणि प्रत्येक तपासणी ही एका जीवाला वाचवण्याची संधी आहे.