no images were found
प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामध्ये 22 डिसेंबर रोजी डाक अदालत
कोल्हापूर : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्यामार्फत दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक डाकघर ए.व्हि. इंगळे यांनी दिली आहे.
कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत खाते व प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी यामध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिका-यास मूळ तक्रार पाठविली असेलत्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ए.व्हि. इंगळे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर-४१६००३ यांच्या नांवे दोन प्रती सह दिनांक १८ डिसेंबर २०२३ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, असेही श्री. इंगळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.