no images were found
शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध
जळगाव : चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आ. सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर पुन्हा टांगती तलवार आहे.
लता चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. तथापि, त्यांच्या विरूध्द पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यातून जात पडताळणी समितीने लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात लता सोनवणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खंडपीठात दाद मागितल्यानंतरही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश – लता सोनवणे यांच्या याचिकेवर न्या. के. एम. जोसेफ आणि ऋषीकेश रॉय यांच्यासमोर आज कामकाज झाले. यात न्यायालयाने त्यांच्या मागणीनुसार जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. लता सोनवणे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पुन्हा याचिका दाखल करणार : प्रा. सोनवणे
आमदार लता सोनवणे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार आहोत. तसेच या निर्णयाने आमदारकी रद्द होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.