
no images were found
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार
केंद्र सरकारने कांदा निर्यातबदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या या दोन्ही निर्णयांचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकार या विषयांवर केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. दरम्यान, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडू लागले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातले विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत. अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.