
no images were found
पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम प्रवेश सुरु
कोल्हापूर (प्रतिनिधी): विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. त्या अंतर्गत शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम सायंकाळी, आठवड्यातून ६ तास या पद्धतीने असेल. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन विदेशी भाषा विभागातर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम असणारी शिवाजी विद्यापीठ ही एकमेव संस्था आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ कोल्हापुरातील महाविद्यालयांत, तसेच विद्यापीठातील सर्व अधिविभागांत विविध विद्याशाखांत इतर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी, विशेषत: इतिहास विषयाचे विद्यार्थी-संशोधक, शिक्षक- अभ्यासक, व्यापार क्षेत्रातील लोक घेऊ शकतात. पोर्तुगीज भाषा, तिच्या इतिहास आणि संस्कृतीप्रमाणेच एक समृद्ध भाषा आहे. ती जगातील सहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पोर्तुगाल बरोबरच ब्राझील, अंगोला, केप वर्दे, साओ टोमे आणि प्रिंसिपे, गिनी बिसाऊ, मोझांबिक, इक्वेटोरियल गिनी आणि ईस्ट तिमोर या देशांची ती अधिकृत भाषा आहे. या देशांशी भारताचे व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत. तसेच, गोवा येथे पोर्तुगाली संस्कृतीचे ऐतिहासिक वातावरण, त्याचा गोव्यातील कलाजीवनावर असलेला प्रभाव यामुळे तेथील विविध क्षेत्रात पोर्तुगीज भाषेच्या संधी आहेत. तसेच भाषांतर, पर्यटन, उद्योग क्षेत्रात शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. इच्छुकांनी त्वरित विदेशी भाषा विभाग, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ येथे संपर्क साधावा.