
no images were found
युवकांनी नाव नोंदणी करून ‘मतदार’ होण्याचे विभागीय आयुक्त यांचे आवाहन
कोल्हापूर : १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार नोंदणी करून ‘मतदार’ व्हा असे आवाहन विभागीय आयुक्त पुणे तथा निवडणूक यादी निरीक्षक सौरभ राव यांनी कोल्हापूर येथे केले. त्यांनी जिल्ह्यातील विविध पक्ष व त्यांचे लोकप्रतिनिधी तसेच निवडणुक प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी यांची मतदार यादी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील आजची अंदाजीत १५४००८ लोकसंख्या आहे. मात्र २०२१ च्या मतदार यादीनुसार या वयोगटातील ४१८९५ युवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यावरून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतदार नोंदणीसाठी प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचून ‘मतदार व्हा’ हे अभियान राबवण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, आयुक्त कार्यालय पुणे येथील नोडल अधिकारी वैशाली इंदाणी, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, श्रीमती वसुंधरा बारवे, सुशांत बनसोडे, हरीश धार्मिक, वर्षा शिंगण, संपत खिलारी, समीर शिंगटे, मोसमी चौगुले, मोहिनी चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी रवींद्र कांबळे, विजय जाधव, चंद्रकांत घाटगे, अजित फराकटे, विजय करजगार, बी आर मालप, मारुती कसबे, संजय पोवार आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तपासणी कार्यक्रमाचे काम सर्व जिल्ह्यात सुरू असून या यादीच्या निरीक्षणाची कार्यवाही विभागीय आयुक्त यांच्याकडून सुरू आहे. मतदार यादीतील नाव नोंदणी, नावामधील दुरुस्ती व नाव कमी करणे अशा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विभागीय आयुक्त तीन वेळा भेटी देणार आहेत याच अनुषंगाने आजची पहिली बैठक घेण्यात आली. नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सूचना नजरेसमोर ठेवून या प्रक्रियेत निर्णय घेतले जाणार आहेत. बुथ पातळीवरती पक्षामार्फत सहाय्यक (बीएलए ) नेमले जातात त्यांचे काम महत्त्वाचे असून प्रत्येक बुथ पातळीवरील मतदारांना ते ओळखतात. त्यामुळे पारदर्शक मतदार यादीसाठी त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे असे सौरभ राव यांनी बैठकीत प्रतिपादन केले.
सर्वसामान्य मतदारांमध्ये मतदान प्रक्रिया ही पवित्र असणार यासाठी विश्वास निर्माण करा, युवकांमध्ये विविध पक्ष व मतदान याविषयी अनास्था असते तीही दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच वृद्धांसाठी वेगळी व्यवस्था करून त्यांना रांगेत त्रास होणार नाही याची काळजी घ्या याही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
डिसेंबर मध्ये बूथ लेवलला मतदार जनजागृती व नव मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घ्या. सर्व महाविद्यालयात संपर्क साधून १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदान नोंदणी केली आहे किंवा नाही याच्या याद्या लेखी स्वरूपात घ्या. त्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून नोंदणीसाठी नव मतदारांना प्रवृत्त करा. या प्रक्रियेत स्थानिक पक्ष यांचा समावेश करता येईल याकडेही लक्ष द्या या पद्धतीच्या सूचना त्यांनी बैठकीत लोकप्रतिनिधी व प्रशासनास केल्या.
जिल्ह्यात ३००४८ नावे कमी करावयाची आहेत. आत्तापासूनच जी नावे कमी करणार आहेत ती यादी सर्व पक्षांना द्या म्हणजे त्यांची प्रत्यक्ष खात्रीही होईल व ती वेळेत कमी करता येतील. कोणीही पात्र मतदार ज्याने नोंदणीसाठी अर्ज केला आहे तो मतदार यादीत समाविष्ट करण्याचा राहिला नाही पाहिजे याबाबत स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. यावेळी लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश आवडे यांनी मतदार यादीबाबत, नव मतदार नोंदणी बाबत येणाऱ्या समस्या आयुक्तांना सांगितल्या. आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामधील विविध मुद्द्यांवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली.