
no images were found
डिजीटल युगात विद्यार्थ्यांना लेखनाद्वारे अभिव्यक्त व्हावेसे वाटणे स्वागतार्ह: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर : डिजीटल युगातही विद्यार्थ्यांना लेखनाद्वारे अभिव्यक्त व्हावेसे वाटते आहे, ही बाब अतिशय स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या (सन २०२१-२२) पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सृजनशीलतेची जोपासना व्हावी आणि ती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, यास्तव महाविद्यालयामधून प्रति वर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या नियतकालिकांची स्पर्धा विद्यापीठामार्फत प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या अंकांतून वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्याच्या आणि महाविद्यालयांकडून दर्जेदार नियतकालिके प्रकाशित व्हावीत, या हेतूने शिवाजी विद्यापीठाची ही योजना सन १९७० पासून सुरु आहे. तेव्हापासून आजतागायत अनेक महाविद्यालयीन नियतकालिकांनी आपले सातत्य टिकविले आहे आणि आपली वैशिष्ट्यपूर्णताही जपली आहे. काही नियतकालिकांत तर मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पलिकडे ऊर्दू, कन्नड आणि संस्कृत भाषांतूनही विद्यार्थी व्यक्त झाले आहेत, हे प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाच्या ऊर्मी आहेत, त्यांना स्थान देण्यात महाविद्यालयांनी कमी पडू नये. छपाई खर्चिक होत असल्यास ई-मॅगेझीन स्वरुपात आपल्या वेबसाईटवर त्यांची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व व लेखन कौशल्य विकासाच्या दृष्टीने नियतकालिक स्पर्धा हा महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्याबरोबरच सुप्तगुण प्रदर्शित करण्याची संधी मिळते. त्यांची प्रतिभा त्या निमित्ताने सामोरी येते. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे.
या स्पर्धेतील सन २०२१-२२साठीच्या विजेत्या महाविद्यालयांची नावे (कंसात प्राचार्य व संपादक आणि नियतकालिकाचे नाव यानुसार) अनुक्रमे पुढीलप्रमाणे:
बिगर व्यावसायिक गट: मुधोजी महाविद्यालय, फलटण (प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर – उदय), विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. आरिफ शौकत महात – विवेक), सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, जि. सातारा (डॉ. एम. एम. राजमाने, डॉ. दिलीपकुमार कसबे – सद्गुरू)
व्यावसायिक गट: तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर, जि. कोल्हापूर (डॉ. एस.व्ही. अणेकर, डॉ. बाळासो साळोखे – होरायझन), आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, आष्टा, जि. सांगली (डॉ. व्ही.एस. पाटील, डॉ. एस.एस. मोहिते – ज्ञानदारंभ), डी.के.टी.ई.चे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनियरिंग इन्स्टिटयूट, इचलकरंजी, जि.कोल्हापूर (डॉ. श्रीमती एल.एस. अडमुठे, डॉ. आर.डी. शिर्के – अंबर)
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे व सेमिनार विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले, तर राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.