no images were found
जालन्यात भुजबळ-मुंडेंचा मोर्चा !
मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांचं आदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा समाजातील कुटुंबांच्या कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यास सुरुवात केली आहे. अनेक कुटुंबांच्या या नोंदी सापडल्या असून त्यांना आता आरक्षण मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार असल्याने मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रासप नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जालन्यातील आंबड येथे एक मोठं आंदोलन करणार आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याच जालन्यात आंदोलन करून भुजबळ-मुंडे हे जरांगे पाटलांना आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यात ओबीसी नेते विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष सुरू असतानाच भुजबळ हे आंदोलन करणार असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं बोललं जात आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, गरीब ओबीसींना आणि इतरांनाही पटलं आहे की, अनेक गरीब मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत असेल तर दिलं पाहिजे. ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध करू नये, असं सामान्य ओबीसी, धनगर आणि मुस्लीम बांधवांना वाटतंय. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये. असं सामान्य जनतेसह सगळ्यांनाच वाटतंय. ओबीसी नेत्यांनी त्यांच्या राजकीय हट्टापायी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये, असं सामान्य ओबीसींना वाटतं. हेच सत्य आहे.