no images were found
बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवले;
लाखो रुपये लंपास, सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील घटना
नागठाणे : सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवून चोरट्यांनी एटीएममधील लाखो रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर असलेल्या नागठाणे येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीनच्या कांड्यानी उडवून देण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारला. त्यानंतर जिलेटीन कांड्यांचा स्फोट करून एटीएम उडवून देण्यात आले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम लंपास झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान; दोन महिन्यांपूर्वी कराड येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनच्या स्फोटाने उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, बॅंकेतील सुरक्षा यंत्रणेमुळे पोलिस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला होता. तसेच पोलिसांनी एका चोरट्याला थरारकरित्या पकडले होते.या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.