
no images were found
बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये
कोल्हापूर(प्रतिनिधी) : विविध संस्कृतींमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य अनुवादाच्या माध्यमातून होते. बहुसांस्कृतिक समाजामध्ये एकजिनसीपणा कायम राखण्याच्या दृष्टीने अनुवाद आणि अनुवादकांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आजपासून भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर (ओडिशा) यांच्या सहकार्याने अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. मुळ्ये बोलत होते. कार्यक्रमास बीजभाषक म्हणून हैद्राबादच्या इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू डॉ. माया पंडित, तर अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.
डॉ. मुळ्ये म्हणाले, भारतासारख्या बहुसांस्कृतिक व बहुभाषिक देशामध्ये जिथे संविधानातच २२ भाषांची नोंद आहे आणि जिथे इतक्या भाषांमधील साहित्य प्रकाशित करणारी प्रचंड व्याप असणारी साहित्य अकादमी आहे, तिथे भाषा ही दोन माणसांत केवळ संवादाचे नव्हे, तर या सर्व संस्कृतींना जोडणाऱ्या पुलाचे काम करते. त्याद्वारे माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि देशाची एकता, अखंडता कायम राहण्यास मदत होते.
भावनांच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषा, राष्ट्रभाषा महत्त्वाच्या असल्याचे सांगून डॉ. मुळ्ये म्हणाले, जागतिक स्तरावरील शब्द हे फार महत्त्वाचे प्रवासी आहेत. माणसांच्याही आधी भाषा जगाच्या पाठीवर सर्वदूर पसरलेली असते. मराठीमध्ये आपल्या भोवतालातील भाषांबरोबरच अरबी, फारसी अशा अनेकविध भाषांमधून शब्द आलेले आहे आणि आपल्याला ही बाब माहितीही नाही, इतके रुळलेले आहेत. त्याचप्रमाणे मराठी, संस्कृतमधील अनेक शब्द जगाच्या पाठीवरील अन्य भाषांमध्ये जाऊन प्रस्थापित झालेले आहेत. टॅमरिंड (चिंच) हा शब्द आपल्या तमरहिंद किंवा जिंजर (आले) हा शब्दही आपल्या शृंगवेरम शब्दापासून घेतला गेलेला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण आपल्या भाषा, त्यांच्याशी निगडित अस्मिता सोडणे जितके गैर तितकाच अन्य भाषांचा दुस्वास करणेही चुकीचे आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संवाद-अनुवाद यात्रा ही खूप महत्त्वाची आहे. भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला प्रगतीपथावर मोठी मजल मारणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अनुवादाच्या प्रक्रियेकडे उद्योग-व्यवसाय संधीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, उद्योग-व्यवसायांसाठी अनुवाद आणि अनुवादाचा उद्योग-व्यवसाय या दोन्ही अंगांनी युवकांनी अनुवादाकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. अनुवादकाचे काम लेखकापेक्षा जबाबदारीचे आणि जोखमीचे असते. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक, प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम शिकविण्याचे धोरण अंगिकारले आहे. हा अनुवाद करणे किचकट आणि आव्हानात्मक आहे. सामाजिक विज्ञान, कला विद्याशाखांच्या बाबतीत ते थोडे सुलभ असले तरी