no images were found
जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार!
मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये यांना आग लावण्याचे प्रकार घडल्याचे दिसत आहेत. तर, काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने अन्न-पाणी सोडले होते. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा समाज बांधवांनी सातत्याने विनंती केल्यामुळे सोमवारी त्यांनी पाणी प्यायले होते. आता, पुन्हा एकदा त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे, त्यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाज आक्रमक झाला असून नेतेमंडळींना फोन करुन राजीनामा देण्याची मागणी करत आहे. एका आंदोलकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना थेट फोन करत, मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत, असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. तसेच, आंदोलन चिघळू नये यासाठी त्यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक हिंसक झाले. म्हणून, उपोषणकर्ते पाटील यांनी आजपासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत.
आपल्याला आरक्षण मिळणारच. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल. आपल्या दारात कोणीही यायचे नाही आणि त्यांच्या दारात आपण कशामुळे जातोय, असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत, शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.