
no images were found
‘मनोज जरांगेंना अटक करा-सदावर्तें
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुढे सदावर्ते म्हणाले की, पोलिसांच्या समोर गाड्यांची तोडफोड केली. शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? असा प्रश्न त्यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. तर मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. सरकारने एकट्या जरांगेचं ऐकू नये असंही सदावर्ते म्हणालेत.सदावर्ते यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. माझी मुलगी घाबरून ८ दिवसांपासून शाळेत गेली नाहीये. माझ्या पत्नीला, मुलीला धमक्या दिल्या जात आहेत, असं देखील सदावर्ते म्हणालेत.
हेही वाचा: Accident News: मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी
पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. हीच का मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? मला कोणीच शांत करू शकणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.
माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचं ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही. सलाईन लावून उपोषण होत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं आहे.