
no images were found
महिलांनी स्वतःच्या चांगल्या क्षमता ओळखायला हव्यात – राहूल रेखावार
कोल्हापूर : पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कुठेही कमी नाहीत त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून ‘स्व’ विकास साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत केशवराव भोसले नाट्यगृहात “जागर स्त्री शक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . यावेळी मंचावर सिने अभिनेते पंकज विष्णू, माजी नगरसेविका रूपाराणी निकम, पुष्पा पाटील, कार्यक्रम संयोजिका सीमा देसाई- नायर आदी उपस्थित होते .
जिल्ह्यातील पर्यटन वाढावे. कोल्हापूरचे राजेशाही वैभव जगासमोर यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने यंदा ‘शाही दसरा कोल्हापूरचा’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे . त्याचाच एक भाग म्हणून ‘जागर स्त्री शक्तीचा ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासनाची महिलांविषयक विविध धोरणे स्त्रियांना समजण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर शासनाच्या महिलांविषयक धोरणांचा उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन रुपाराणी निकम यांनी केले .
दि 18 ते 23 आक्टोंबर या कालावधीत राज्यातील 6 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागूपर ) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लघू नाटिका, नृत्य, स्लाईड शो आदीद्वारे राज्य शासनाच्या महिलांविषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच या वेळी नाटयगृहात उपस्थित महिलांसाठी प्रश्नमंजूषाही घेण्यात आली. विजेत्या महिलांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.