
no images were found
श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित
कोल्हापूर : राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार या वर्षीपासून सुरु केला आहे. हा पुरस्कार 2023 सालासाठी संगीत क्षेत्रातील जेष्ठ विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे.
कोल्हापूर ही छत्रपती महाराणी ताराराणींच्या कर्तृत्वाने पावन झालेली भूमी आहे. तसेच श्री महालक्ष्मी- अंबाबाई देवीच्या या भूमीला अनन्य साधारण असे महत्व आहे. कोल्हापूरातील विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा परिचय देशाला आला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या वैभवात भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग कामगिरी केलेल्या कोल्हापूरच्या एका महिलेला प्रत्येक वर्षी शाही दसऱ्याच्या कार्यक्रमादरम्यान सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात येणार असून त्याच्याकरीता समिती मध्ये पालकमंत्री, कोल्हापूर (अध्यक्ष), जिल्हाधिकारी कोल्हापूर, कुलगुरु शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे पदसिध्द सदस्य असून उद्योग व व्यवसाय, सामाजिक, क्रिडा, शिक्षण आणि साहित्य-कला-संगीत या क्षेत्रातील प्रत्येकी एक कोल्हापूरमधील प्रथितयश व्यक्ती व एक निवृत्त वरीष्ठ शासकीय अधिकारी हे अशासकीय सदस्य ठरविण्यात आले आहेत.
दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये चर्चा करुन पहिल्या वर्षी द्यावयाचा करवीर तारा पुरस्कारासाठी नामनिर्देशन मागविण्यासाठी व समिती गठीत करण्यासाठी असलेला अपुरा कालावधी विचारात घेऊन सन 2023-24 चा “करवीर तारा” पुरस्काराचा मानकरी हा समितीच्या केवळ पदसिध्द सदस्यांनी मिळून ठरवावा असा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने श्रृती सडोलीकर-काटकर यांना या वर्षीचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुरस्काराचे वितरण दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता केशवराव भोसले नाटयगृहात येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व प्रमुख पाहुणे पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील आणि जेष्ठ चित्रकार श्रीमती विजयमाला मेस्त्री यांच्या उपस्थितीत श्रीमती श्रृती सडोलीकर-काटकर यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ याव्दारे गौरविण्यात येणार आहे.