no images were found
न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांकडून धनगरवाडीत आरोग्य सेवा
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्राॅनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी पावनखिंडजवळील धनगरवाडी आणि परिसरातील वस्त्यांमध्ये मेडिकल किटचे मोफत वाटप केले. या किटमध्ये सॅनिटरी पॅड, वेदनाशामक स्प्रे, जखमेवरची जंतूनाशक क्रिम, बॅन्डेड पट्ट्या, इलेक्ट्रल पावडर असे प्रथमोपचार साहित्य समाविष्ट होते. प्रा. रश्मी पंडे यांनी वाडी-वस्तींमधील मुली व महिलांशी या मेडिकल किटच्या वापरासंदर्भात संवाद साधला.
यानंतर विद्यार्थ्यांनी पावनखिंड येथे भेट दिली. प्रा. दिपक जगताप यांनी विद्यार्थ्यांना पावनखिंडचा इतिहास कथन केला. पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आदी कचरा विद्यार्थ्यांनी संकलित केला. विद्यार्थ्यांनी आंबा येथील देवराईला भेट देवून त्याचे निसर्गचक्रातील महत्व समजून घेतले. त्याचबरोबर पश्चिम घाटातील प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा, फुले, किटक, ज्वालामुखीचे खडक, नदीचा उगम याबद्दल निसर्ग संवर्धन कार्यकर्ते उमाकांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. अर्चना गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना तेथील शेतामध्ये मृदा संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यावेळी रताळी काढणीच्या कामाचाही अनुभव घेतला.
सदर उपक्रम न्यू पॉलिटेक्निक निसर्ग संवर्धन क्लबने (ग्रीन क्लब) आयोजित केला होता. या उपक्रमास प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील, निसर्ग संवर्धन क्लब समन्वयक प्रा. संग्रामसिंह पाटील, वनरक्षक दिग्विजय पाटील, ट्रान्सपोर्ट सुपरवायझर दिग्विजय भोसले यांचे सहकार्य लाभले.