
no images were found
विट्यात आयकर विभागाची पथके दाखल, व्यावसायिकांचे धाबे दणाणले
सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये आयकर विभागाची तब्बल दहा पथके दाखल झाली आहेत अशी चर्चा आहे . त्यामुळे खानापूरसह आटपाडी, तासगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यातील बड्या राजकारण्यांसह मोठ्या सराफी, बांधकाम आणि कापड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सांगली जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा विटा शहरातील मायणी रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये आयकर विभागाच्या तीन बोलेरो आणि सात ते आठ क्रेटा आणि इनोव्हा गाड्या दाखल झाल्या. हे सर्व आयकर विभागाचे मोठे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्याच महिन्यात मुंबईत आयकर विभागाने वेगवेगळ्या सत्तरहून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती.
यामध्ये खानापूर तालुक्यातील आणि सध्या मुंबईमध्ये गलाई व्यवसाय करणाऱ्या एका शेठच्या घरात तब्बल दोन दिवस आयकर विभागाचे अधिकारी होते. त्यांच्याकडून संगणकाच्या फ्लॉपिज, व्यवसाय संदर्भातील कागदपत्रे आणि अन्य ऐवज जप्त केला आहे. त्यानंतर आता थेट विटा शहरातच आयकर विभागाची पथके दाखल झाल्याणने खळबळ उडाली आहे. दरम्यान ही पथके विटा शहर, खानापूर तालुक्यासह आटपाडी, खटाव, तासगाव, कडेगाव तालुक्यातही जाणार असल्याची माहिती मिळत आहे.