
no images were found
मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – संजय मंडलिक
कोल्हापूर : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेत केंद्र शासनाच्या योजनामधील मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया फेब्रुवारी २०२४ पूर्वी वेळेत पूर्ण करुन घ्या असे निर्देश संजय मंडलिक खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिले. यावेळी ते म्हणाले, निवडणुकांच्या आचारसंहिता पूर्वी मंजूर कामे वेळेत सुरू झाली तर नागरिकांच्यासाठी आवश्यक योजना वेळेत पूर्ण करता येतील. कोणताही निधी निविदा प्रक्रिया विलंबाने परत जाणार नाही याची काळजी घ्या. या सभेत केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार तथा सहअध्यक्ष दिशा समिती धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरपरिषद लोकप्रतिनिधी तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा उद्देश पूर्ण होण्यासाठी योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचनाही संजय मंडलिक यांनी केल्या. त्याच बरोबर कोल्हापूर विमानतळ, विस्तारीकरण, रेल्वे वाहतूक व सोयी-सुविधा, दुर्गम भागातील दुरसंचार सेवा व इंटरनेट सेवा, कोल्हापूर महानगरपालिका थेट पाईप लाईन योजना यासह विविध केंद्रस्तरीय योजनांचा आढावा घेण्यात आला.
या सभेत केंद्र शासनाच्या योजनेतून जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषण निमुर्लनाबाबत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घरकुल योजनेतून अनुदान, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा, जिल्ह्यातील रस्त्यांची कामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे याची माहिती घेतली. या बैठकीत प्रकल्प संचालक, डिआरडीए सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले व विविध विषयांची माहिती सभेला सादर केली.
बैठकीत अध्यक्ष तसेच सह अध्यक्ष यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लोकार्पण करताना लोकप्रतिनिधींना कळवावे व त्यांचे उपस्थितीत सदर सोहळा किंवा कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. तसेच प्रत्येक विभागांतर्गत शासनाकडे सादर केलेल्या प्रलंबित प्रस्तावांची माहितीही तातडीने सादर करण्याच्या सूचना यावेळी सर्वांना देण्यात आली. जेणे करून लोकप्रतिनिधी स्तरावरती संबंधित योजना मार्गी लावण्यास सोपे होणार आहे.