no images were found
हिंदुराष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवर रुग्णालयात हल्ला
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र सेनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर सोमवारी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-याने हा हल्ला परतवून लावला. या प्रसंगात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते.
आजारी असल्यामुळे तुषार हंबीर याच्यावर 25 ऑगस्ट पासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर “मोक्का”नुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे.
सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हंबीर याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी चारजण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. हंबीरला मारण्याचा यांनी प्रयत्न केला. त्यावेळी मात्र तेथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोरास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकऱ्यासोबत झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी दिली. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचारी तेथे तात्काळ हजर झाले.