no images were found
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा; एकनाथ शिंदे
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश एकनाथ शिंदेंनी यावेळी विमा कंपन्यांना दिले.
ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त असून त्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असे सांगून विमा कंपन्यांनी देखील याकाळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याची भूमिका संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. यामागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.