no images were found
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचा ‘आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड ‘ पुरस्काराने सन्मान
दुबई : अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्सचे संस्थापक व दूरदर्शी उद्योजक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रीटेल उद्योगातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल इंडिया टुडे समूहातर्फे प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीत (युएई) दुबईमध्ये पाम जुमैरा येथील ताज एक्झॉटिका हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ज्येष्ठ राजकीय नेते व मुत्सद्दी डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते व अनेक नामवंतांच्या उपस्थितीत डॉ. दातार यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. इंडिया टुडे समूहाचे राजदीप सरदेसाई, नबिला जमील, अंजना ओम कश्यप व श्वेता सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्सचा ५० हून अधिक रीटेल सुपर मार्केट्स, पिठाच्या गिरण्या व मसाला कारखाने असा विस्तार आहे. आखाती देशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थाईक झालेल्या भारतीय समुदायाच्या वैविध्यपूर्ण चवींची पूर्तता करणारी उच्च दर्जाची खाद्य उत्पादने रास्त किंमतीत पुरवण्यात हा समूह महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. अस्सल स्वाद व काटेकोर दर्जा निकष राखत अस्सल उत्पादने पुरवण्याची बांधीलकी डॉ. दातार यांनी कायम निभावल्याने त्यांना संयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांमध्ये प्रेमादराचे स्थान प्राप्त झाले आहे.
आयकॉन ऑफ दुबई हा पुरस्कार केवळ डॉ. दातार यांच्या यशाचाच गौरव नसून त्यातून भारतीय समुदायाच्या खाद्य अनुभवाला समृद्ध बनवण्याप्रती त्यांची कटिबद्धताही अधोरेखित होते. व्यवसायात उत्कृष्टता व समाजसेवेप्रती बांधीलकी जोपासण्यात डॉ. धनंजय दातार करत असलेल्या अखंड परिश्रमांनी रीटेल क्षेत्रात गुणवत्तेचा एक वाखाणण्याजोगा मापदंड स्थापित झाला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, आयकॉन ऑफ दुबई पुरस्कार मी नम्रतेने स्वीकारत आहे. दर्जेदार उत्पादने देऊन व भारताचा अस्सल स्वाद राखून आपल्या समुदायाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला मिळालेला हा पुरस्कार एकप्रकारे संपूर्ण अदील परिवाराचे परिश्रम व समर्पितता यांचाच पुरावा आहे.
इंडिया टुडे समूहाने डॉ. दातार यांनी रीटेल उद्योगात बजावलेल्या असाधारण कामगिरीचा केलेला सन्मान हा त्यांची दुबईतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ही ओळख अधिक दृढ करणारा आहेच, परंतु त्याबरोबर तो भारतीय समुदायासाठीही अभिमानास्पद आहे.