no images were found
जिल्ह्यात ‘एक तास एक साथ’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद प्रशासन शाखा, कोल्हापूर तसेच जिल्ह्यातील नागरी भागात ‘एक तास एक साथ स्वच्छता’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला असून नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘स्वच्छता ही सेवा 2023’ अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम शहरी भागात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘एक तास एक साथ’ हा श्रमदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपक्रमामध्ये वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, खासदार, आमदार तसेच एनजीओ, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, कॉलेज, विविध मंडळे, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिल्ह्यातील सर्व 13 नगरपरिषद/ नगरपंचायती व 2 महानगरपालिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमामध्ये जिल्ह्यातील शहरी भागातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, बाजारपेठा, बगीचा, रहिवासी भाग अशा एकूण २५६ ठिकाणी स्वच्छता मोहीम आखून श्रमदान करण्यात आले. यामध्ये एकूण ३२ हजार १५४ नागरिकांनी श्रमदान केले. या उपक्रमामध्ये ३४३ तास श्रमदान करण्यात आले. यावेळी 67 टन कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात आला. एक तास एक साथ या उपक्रमात ४ लाख ११ हजार चौरस मीटर क्षेत्राची स्वच्छता करण्यात आली.उपक्रमाकरिता स्वच्छता साधने तसेच घंटागाड्या पुरवण्यात आल्या होत्या.