no images were found
पाटगावच्या राष्ट्रीय पातळीवरील सन्मानामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल – दीपक केसरकर
कोल्हापूर : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळणे हे राज्यातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातून एकमेव पाटगावला पुरस्कार मिळाल्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाटगाव मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे येथील गावे स्वयंपूर्ण होणार असून यामुळे राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल, अशा शब्दांत गौरव करुन हा उपक्रम राबवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक घटकाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केले आहे.
शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. देशभरातील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.
मधाचे गाव ही राज्यात आणि देशात नवीन संकल्पना असल्याने याकरीता जिल्हा नियोजन समितीने 226.71 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून आतापर्यंत 149.82 लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. यातून मधाचे गाव पाटगावचा मध उद्योग निश्चितच वाढेल व यातून रोजगार निर्मिती देखील होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
गावाची नवी ओळख निर्माण झाल्यानंतर होणारे फायदे –
सेंट्रल नोडल इन्स्टिट्यूट फॉर रुरल टूरिझम अँड होमस्टेजद्वारे पूर्ण पाठिंबा मिळेल आणि सहकार्य दिले जाणार आहे. यामध्ये गावाला G20 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेला प्रोजेक्ट ‘लाईफ’ (लाईफस्टाईल फॉर इंन्व्हायर्नमेंट) च्या मोठ्या छत्राखाली आणले जाणार आहे. पर्यावरणासाठी जीवनशैली यावर आधारित काम सुरु होईल. आजपासून केंद्राकडून शाश्वत पर्यटनासाठी लाईफ अभियान सुरु करण्यात आले आहे. G20 राष्ट्रांमधील सर्वोत्तम पद्धतींचा उपयोग ग्रामीण पर्यटनाच्या प्रचारासाठी मार्गदर्शक म्हणून केला जाईल. या गावांचा आता राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पर्यटन मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटना आणि UNEP (संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम) तसेच इतर भागीदारांच्या पाठिंब्याने प्रचार केला जाईल.
युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, जी -20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास होणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
पाटगाव येथे मधपाळांकडुन मधाचे उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलनासाठी साहित्य पुरविण्यात येणार आहे. मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रीया युनिट उभारुन प्रक्रीया झालेल्या मधाचे पॅकेजिंग व ब्रँन्डींग करुन तो मार्केटीगसाठी उपलब्ध होईल.
पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयाच्यावतीने न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा दर्जेदार पध्दतीने देण्यात येणार आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देण्यासाठी माहिती केंद्र तयार केले आहे. लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल. तसेच पाटगावसह या भागातील गावे स्वयंपूर्ण होतील..