no images were found
म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन जुन्या मुंबईची आठवण काळाच्या पडद्याआड जाणार
मुंबई: मलबार हिल परिसरात असलेले हँगिंग गार्डन आणि म्हातारीचा बूट हे पर्यटकांच्या आणि बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हँगिंग गार्डन हा परिसर जुन्या मुंबईची ओळख आहे. अत्यंत वेगाने होत असलेल्या विकासामुळे मुंबईतील तब्बल १३६ वर्षांचा इतिहास असलेले आणि मुंबईची ओळख असणारे हँगिंग गार्डन हे लवकरच बंद होणार आहे.
हँगिंग गार्डनच्या परिसरात होणाऱ्या या विकासकामाला काही स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आम्ही या सगळ्यात पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन लोढा यांच्याकडून देण्यात आले आहे.
हँगिग गार्डनचा परिसर हा मुंबईतील उंचावरच्या भागांपैकी एक आहे. ब्रिटिशकाळात दक्षिण मुंबईच्या परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी याठिकाणी जलाशय बांधण्यात आला होता.
मलबार हिल येथील टेरेस गार्डनखाली असणाऱ्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास ७ वर्षांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या काळात हँगिग गार्डनचा परिसर हा टप्याटप्प्याने बंद केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
पी. वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हँगिग गार्डनच्या परिसरात होणाऱ्या विकासकामाच्या प्रक्रियेत जवळपास ४०० झाडे कापली जाणार आहेत. मात्र, यापैकी काही झाडे बाजूच्याच भागात पुन्हा लावली जातील. ४०० पैकी १८९ वृक्ष हे पूर्णपणे कापले जातील, तर २०० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाईल.
हँगिंग गार्डनचा परिसर वेगवेगळा करुन त्याखाली असणाऱ्या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यासाठी ६९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून नोव्हेंबर २०२३ पासून हँगिग गार्डनच्या परिसरात कामाला सुरुवात होईल.