no images were found
शाहीर साबळेंवरील चरित्रपटामध्ये साबळेंची पणती करणार त्यांच्या पत्नीची भूमिका
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज म्हणजे ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. त्यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा योग जुळून आला आहे. नातवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका कोण करत आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. तर ही भूमिका करतेय शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे!
‘महाराष्ट्राचे शाहीर’ अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील चरित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होत आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या महाराष्ट्र गीतासह ‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी…शोभते खणी, किती नरमणी…’, ‘या गो दांड्यावरून….’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या….’ अशी दर्जेदार लोकगीते देणाऱ्या या शाहिरांची भूमिका आघाडीचा नायक अंकुश चौधरी करत आहे. शाहिरांच्या यशामध्ये त्यांची पत्नी भानुमती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गायलेली अनेक लोकगीते भानुमती यांनी लिहिली होती. त्यांचीच महत्त्वाची भूमिका सना केदार शिंदे करत आहे. म्हणजे नातवाने आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मिळ योग जसा या चित्रपटातून जुळून आला आहे, तसाच किंवा अधिक दुर्मिळ असा पणतीने पणजीची भूमिका करण्याचा योगही ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये जुळून आला आहे. ही चित्रपटसृष्टील कदाचित एकमेव घटना असावी.