no images were found
प्रशासनाची गणेशोत्सवात भाविकांना विसर्जन न करण्याची जबरदस्ती का ?
कोल्हापूर(प्रतिनिधी ) – वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तरी ते रोखण्याच्या दृष्टीने काहीही कृती केली जात नाही; मात्र तेच वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवामध्ये श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असे म्हणत प्रशासन आणि पर्यावरणवादी जागे होतात. गणेशोत्सव हा धार्मिक विषय असतांना प्रशासन हिंदूंचे धर्माचार्य, संत, अधिकारी यांच्याशी कोणतीही चर्चा न करता श्री गणेशमूर्ती विसर्जन होऊ देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेते. त्यामुळे प्रशासनाची गणेशोत्सवात भाविकांना विसर्जन करू न देण्याची जबरदस्ती का ?, असा प्रश्न समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. ही पत्रकार परिषद 16 सप्टेंबरला ‘प्रेस क्लब’ येथे घेण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, विश्व हिंदु परिषेदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री. विजय पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे अर्जुन आंबी, युवासेनेचे श्री. रोहन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.
श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘ या संदर्भात करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी एक पत्र दिले आहे. त्यात अशासकीय किंवा शासकीय संस्थांना श्री गणेशमूर्ती दान घेण्याचा हक्क पोचत नाही; कारण ते ‘सेक्युलर’ राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. कृत्रिम तलाव केवळ गणेश विसर्जनासाठी करणे व जनतेचा पैसा वाया घालवणे योग्य नाही. त्यापेक्षा आहे त्या तलावात एका विशिष्ट जागी गणपति पारंपरिक पद्धतीने विसर्जित करावेत, असे त्यात नमूद केले आहे.’’
श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांचे पाणी पंचगंगा नदीत सोडल्याने हजारो मासे मृत झाल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत घडलेल्या आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही ठोस कृती केलेली नाही.’’ अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात पंचगंगा नदी कोणकोणत्या कारणांमुळे प्रदूषित होत आहे, हे सविस्तर विविध प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या संदर्भात कोणतीही ठोस कृती न करता, प्रशासन केवळ श्रीगणेशमूर्ती विसर्जनामुळेच प्रदुषण होते हे कसे काय सांगते ? श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर प्रदुषण वाढते, असा कोणताही अहवाल अथवा अभ्यास प्रशासनाकडे आहे का ?’’
श्री. उदय भोसले म्हणाले, ‘‘एकीकडे प्रशासन वारंवार हिंदूंच्या सणांच्या प्रसंगी विसर्जन आणि ध्वनीप्रदुषणाविषयी कायद्याचे अंमलबजावणीची भाषा करते, तर दुसरीकडे तेच प्रशासन अन्य धर्मियांचे सण-उत्सवांविषयी मात्र कोणतीच भूमिका न घेता मूग गिळून गप्प बसते. वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते असे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगते आणि दुसरीकडे अन्य धर्मियांवर मात्र कायदा मोडला जात असून कोणतीही कारवाई होत नाही ! त्यामुळे प्रशासनाने हिंदु धर्मियांना यंदा श्री गणेशविसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची बळजोरी करू नये, असे आवाहन या निमित्ताने आम्ही करत आहोत.’’
श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘गतवर्षी शहरातील इराणी खण येथे एका एका स्वयंचलीत यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या स्वयंचलीत यंत्रामध्ये एक फिरणारा पट्टा असून त्यावर एका बाजूने श्रीगणेशमूर्ती ठेवण्यात येत असून त्या पटट्यावरून सरकत जाऊन पुढे खणीत विसर्जित होतात. यंदाही प्रशासन या यंत्राद्वारेच विसर्जन करणार असणार आहे. वास्तविक गणेशोत्सव हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा धार्मिक उत्सव आहे. त्यामुळे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘यांत्रिक पद्धतीचा’(कन्व्हेअर बेल्ट)ची व्यवस्था करू नये. असे करण्याऐवजी महापालिकेने इराणी खाण येथे विसर्जनासाठी घाट पद्धतीने पायर्यांचे बांधकाम केल्यास भाविकांनी थेट आत उतरून विसर्जन करणे शक्य होईल, तसेच घाट पद्धतीचे बांधकाम केल्याने भाविकांना आरती करणे शक्य होईल.