no images were found
कला-संस्कृतीचा वारसा तरुणांनी वृद्धिंगत करावा: कुलगुरू डॉ. शिर्के
कोल्हापूर (प्रतीनिधी ) : भारतीय कला, संस्कृतीचा वारसा वृद्धिंगत करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने युवा पिढीने कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३मध्ये राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभागीय युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव आदींमध्ये पदकांसह यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव समारंभ आज सकाळी राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विविध युवा महोत्सवांमध्ये आपले वर्चस्व सातत्याने टिकवून ठेवले आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि उर्जेसह मंचावर सादरीकरण करून आपले विद्यार्थी विद्यापीठाचा लौकिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावित आले आहेत. त्यांनी आपल्या कला, संस्कृतीचा वारसा असाच वृद्धिंगत करीत राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठात विविध प्रकारच्या वाद्यांच्या सादरीकरणाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असून त्यासाठी सर्व युवा वर्गाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.