no images were found
दुर्गादेवीचा पाट पूजन उत्साहात १९ ते २४ ऑक्टोबर होणार उत्सव
कोल्हापूर (प्रर्तीनिधी ) – येथील सार्वजनिक श्री श्री दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने बसविण्यात येणाऱ्या दुर्गादेवीच्या पाट पूजनाचा कार्यक्रम मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री मोठ्या उत्साहात झाला.
गेल्या २३ वर्षांपासून येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे मंडळाच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गुजरी येथे कारागीर करणाऱ्या बंगाली कामगारांच्या वतीने उत्सव आयोजित केला जातो. दरम्यान, काल रात्री कोलकत्याहून आणलेली माती आणि कलाकारांनी धार्मिक विधीनंतर विधिवत मूर्ती बनविण्यास सुरवात केली. इको फ्रेंडली असणारी महिषासूर मर्दिनी रूपातील दुर्गेची ही मूर्ती महादेव, लक्ष्मी, सरस्वती, कार्तिक, गणेश अशी परिपूर्ण असणार आहे. उत्सवाची सुरवात १९ ऑक्टोबर म्हणजे ललिता पंचमीला होऊन तो पुढे २४ ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत असेल. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, देबाशीष डेनरिया, सचिव संदीप मंडल, आशीष मंडल, खजानिस गौरव भुनिया, इंद्रजित सामंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक म्हणाले की, कामाच्या वाढत्या व्यापामुळे सर्वांनाच गावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे येथेच मूर्तीची प्रतिष्ठापना करून सर्व धार्मिक विधी यथासांग करतो. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन एक-दोन दिवसांमध्ये होईल. या निमित्ताने आवाहन करतो की, १९ ते २४ ऑक्टोबर दरम्यान सर्वांनी दैवज्ञ बोर्डिंग येथे उपस्थित राहावे व दुर्गादेवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.