no images were found
“अभियंते पुरवण्यासाठी जगाला भारताकडून अपेक्षा” – डाॅ. प्रतापसिंह देसाई.
कोल्हापूर (प्रतिनिधी ): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक आठवड्याच्या दीक्षारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. डाॅ. प्रतापसिंह देसाई हे इन्डियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य आहेत. शास्त्रज्ञ तसेच होशांग पटेल टेक सेंटरचे प्रमुख व घरडा फाउन्डेशनचे मुख्य मार्गदर्शक डाॅ. रंगा बोडावाला हे विशेष निमंत्रित होते. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे संचालक विनय पाटील, सविता पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर, प्रा. नितीन पाटील, विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डाॅ. संजय दाभोळे यांनी डिप्लोमा इंजिनिअरींग नंतरचे करिअर, बोर्डाचे वेळापत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बनवलेला अभ्यासक्रम, परिक्षा पद्धती, काॅलेजमधील विविध उपक्रम व सुविधा इत्यादी माहिती विद्यार्थी व पालकांना दिली.
डाॅ. रंगा म्हणाले की, हे नवीन विद्यार्थी भाग्यवान आहेत की अशा गौरवशाली परंपरा असलेल्या संस्थेत प्रवेश मिळाला आहे. सद्ध्याची आपली सुखवस्तू जीवनशैली ही शास्त्रज्ञ व अभियंत्यांची देण आहे. तुम्ही मुले ही भविष्यातील शास्त्रज्ञ व अभियंते आहात, देशाचे आधारस्तंभ आहात.
डाॅ. प्रतापसिंह देसाई पुढे म्हणाले की, सन २०३० पर्यंत भारताचं सरासरी वयोमान २५ वर्षे असेल आणि जगभरात १११ कोटी अभियंत्यांची गरज असणार आहे. सक्षम अभियंते पुरवण्यासाठी जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इंजिनिअरींग शिक्षण हे फक्त नोकरीसाठी असु नये, तर त्यायोगे इंजिनिअरींग माईंड तयार झाले पाहिजे. आपण इनोव्हेटिव्ह व्हायला हवे. आपले काम अतिशय चोखपणे व मन लावून करा. प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. आत्मपरीक्षण करत रहा. ISTE कायम तुमच्या सोबत राहील, हे अभिवचन देतो.
के. जी. पाटील म्हणाले की, स्वतःला ओळखून ज्ञान आत्मसात करा, तरच तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात चमक दाखवाल. तुमच्या कार्यातून कुटुंबाचा, काॅलेजचा व देशाचा उत्कर्ष करा. तुम्हाला शुभेच्छा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन शिंदे, आभारप्रदर्शन प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी केले. प्रा. प्रविण जाधव व मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.