
no images were found
भवानी मंडपातील ऐतिहासिक क्रीडा स्तंभ सुशोभिकरणाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर : भवानी मंडप येथे उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक क्रीडा स्तंभ सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीअंबाबाई मंदिराभोवती उभारण्यात येणारे आकर्षक व ध्वनीयुक्त खांब व डेकोरेटीव्ह विद्युत खांब बसवण्याच्या कामाचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंची नावे या क्रीडा स्तंभावर कोरण्यात आलेली आहेत. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा अन्य खेळाडूंना व विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने या स्तंभाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने हे काम करण्यात आले आहे. तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, क्रीडाधिकारी शंकर भास्करे, मनीषा पाटील, रोहिणी मोकाशी, मार्गदर्शक रवी कुमठेकर, प्रवीण कोंढावळे, मंदाकिनी पवार, संदीप जाधव, गौरव खामकर, सागर जाधव, सतीश पाटील, सातापा पाटील, क्रीडा प्रबोधिनीचे ओमकार सावळा, हर्षवर्धन खांडेकर, सुरेश पाटील, ओमकार भारती खेळाडूंनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ मध्ये पर्यटन स्थळाचा मूलभूत विकास या योजने अंतर्गत कोल्हापूर शहरातील श्रीअंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविण्यासाठी अंदाजपत्रकीय २ कोटी ६५ लाख ६ हजार ७५८ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जोतिबा रोड- ८ सिंगल आर्म, भवानी मंडप ते जेल-१५ सिंगल आर्म, महाद्वार रोड ते आयडीबीआय कॉर्नर व बिंदू चौक ते मिरजकर तिकटी प्रत्येकी २४ सिंगल आर्म, मिरजकर तिकटी ते कार पार्किंग- १७ सिंगल आर्म, भवानी मंडप ते अंबाबाई मंदिर- २० सिंगल, आर्म भवानी मंडप ते शिवाजी चौक- १२ डबल आर्म पोल बसविण्यात येणार असून असे एकूण १२० पोल बसविण्यात येणार आहेत.
नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी रोड, बिंदू चौक, सीपीआर रोड, दसरा चौक आणि जयंती नाला रोड येथे डेकोरेटीव्ह विद्युत खांब बसविण्यासाठी २ कोटी ८३ लाख ५२ हजार ४७० रुपयांच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवाजी चौक ते सीपीआर चौक ४८ डेकोरेटीव्ह पोल, सीपीआर चौक ते दसरा चौक १३ डेकोरेटीव्ह पोल, दसरा चौक ते बिंदू चौक येथे ४१ डेकोरेटीव्ह पोल, बिंदू चौक ते मार्केट रोड शिवाजी चौक येथे २८ डेकोरेटीव्ह पोल, व सीपीआर चौक ते जयंतीनाला रोड येथे ३५ डेकोरेटीव्ह पोल असे एकूण १६५ डेकोरेटीव्ह पोल बसविण्यात येणार आहेत.