
no images were found
बालगृहांतील बालकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी पुढे यावे – राहुल रेखावार
कोल्हापूर : जिल्ह्यातील अनाथ व गरजू बालके, मुला, मुलींसाठी कार्यरत बालगृहांमधील बालकांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व व्यक्तींनी सेवाभावी वृत्तीने प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. बालगृहांमधील बालकांना प्रशिक्षण देवू इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या विविध बैठका आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, विधी सल्लागार आशिष पुंडपळ, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अनाथ बालकांना शिक्षण व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनाथ प्रमाणपत्र आवश्यक असून ते महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येते. बालकाच्या आई वडिलांचा मृत्यू बालकाच्या 18 वर्षे वयाच्या आत झाला आहे, अशा बालक, व्यक्तींनी अनाथ प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.
जिल्हा पुनर्वसन समिती अंतर्गत बालगृह, निरीक्षण गृहात दाखल असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी आढावा घेतला. कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी येथील इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण मुलांची ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरुन या मुलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. बालविवाह झाल्याचे आढळून आल्यास तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशाही सूचना त्यांनी विभागाना दिल्या.
यावेळी कृतीदल, जिल्हा परिविक्षा समिती, जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती तसेच ‘वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. यावेळी त्यांनी या सर्व विषयांचा आढावा घेतला.
महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक 0231-2661788) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले तसेच विविध विषयांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.