no images were found
रेशीम उद्योजकांचे गाव: बेले
राज्य शासनाच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या अभियानांतर्गत हजारो लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बेले गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून गावातील दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून रेशीम शेतीला पसंती दिली आहे. यातूनच शाश्वत उत्पनाचा नवा मार्ग त्यांना मिळाला आहे. रेशीम शेतीद्वारे बेले गाव प्रगती साधत असून याद्वारे गावाला अग्रेसर बनविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. रेशीम उद्योग करताना रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाकडून दररोज 273 रुपयांप्रमाणे मजुरी हजेरी मिळत असल्यामुळे महिलांना रोजगाराची एक नवीन संधी मिळाली आहे. यामुळेच गावात अनेक महिला ‘रेशीम उद्योजिका’ म्हणून नावलौकीक मिळवत असून ‘बेले’ हे गाव रेशीम उद्योजकांचे गाव म्हणून परिचित होत आहे.
करवीर तालुक्यातील बेले हे साधारण तीन हजार लोकसंख्येचे गाव. या तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते. गावातील तानाजी बंडू पाटील यांनी त्यांच्या साडेतीन एकर शेतीपैकी दोन एकर ऊस शेती तर अर्धा एकरात भात, भुईमूग पीके घेतली. ऊस शेतीतून एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळायचे. उत्पन्नासाठी अन्य पर्यायांच्या शोधात असताना रेशीम शेतीबाबत त्यांना शासनाकडून माहिती मिळाली. गेल्या तीन वर्षात एका एकरात त्यांनी १०० अंडीपुंजच्या १४ तुकड्या घेतल्या आहेत. एकूण १४ तुकड्यांमधून सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. रेशीम कोषांना सर्व खर्च वजा करुन किलोला ४०० ते ८०० रुपयापर्यंत दर मिळतो. त्यांना दोन्ही मुलांसह व पत्नीची साथ आहे. रेशीम शेतीमुळे मुलांना नोकरी नाही मिळाली तरी वर्षभर पैसे मिळविण्याचा हुकमी मार्ग त्यांना सापडला आहे. रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना भेटी देणे, त्यांना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांचे रेशीम उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न असल्यामुळे जिल्ह्याचे रेशीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहाय्याने या गावात रेशीम शेती बहरली आहे. ऊस शेतीच्या पट्ट्यात रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आव्हानात्मक होते. रेशीम शेतीतून नफा मिळेल का याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. पण तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचे संघटन केले. त्यांची पत्नी आश्विनी पाटील यांनीही शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे आर्थिक गणित समजावून दिले. त्यामुळे शेतकरी प्रयोग करीत गेले. त्यांना मिळणारे यश पाहून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली. गावात 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकर तुती लावली आहे. तर 22 जणांची नवीन रेशीमसाठी नोंदणी झाली आहे. किटक संगोपन गृहासाठी शासनाकडुन २१३ मजुरांची हजेरी रक्कम मिळत आहे. पहिल्या वर्षी २८२ दिवस, तीन वर्षासाठी 895 दिवस असे 3 लाख 58 हजार रुपयांपर्यंत शासनाचे अनुदान या 3 वर्षांसाठी मिळाले. हे अनुदान रेशीम शेतीत काम करण्यासाठी कामाच्या मुल्यांकनानुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी बागेचे संगोपन, किटक संगोपनगृह, अंडीपुंजच्या बॅचेस, कोष उत्पादन घेण्यासाठी दिले जाते.
गावातील 10 शेतकऱ्यांनी तुती किटक संगोपन गृहासाठी शेड उभारणी केली आहे. या सर्वांना प्रती बॅच 40 हजार रुपयांपर्यंत नफा मिळत आहे. याशिवाय या कुटुंबांना 273 रुपयांप्रमाणे दर दिवसाला अनुदान मिळत आहे. त्यामुळे ऊसापेक्षा जास्त नफा रेशीम उद्योगात मिळत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. गेल्या दोन वर्षांत केवळ रेशीम शेतीसाठी 50 लाखाहून अधिक अनुदान मिळणारे बेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. रेशीम उत्पादनातून पाटील यांचे कुटुंब तर लखपती झालेच त्याचबरोबर बेले गावही उन्नतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या कुटुंबाची ओळख आता रेशीम उद्योजक अशी झाली आहे. तु आणि ती या रेशीम व्यवसायामुळे या व्यवसायाला तुती लागवड असे नामकरण झाले.
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन तसेच रेशीम विकास अधिकारी राजेश गुलाब कांबळे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे तत्कालीन वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक डॉ. भगवान मारुती खडांगळे, क्षेत्र सहाय्यक कु. प्रियंका बैजू चंदनशिवे या सर्वांच्या सहकार्याने तसेच शिवाजी विद्यापीठाच्या रेशीम शास्त्र विभागाचे माजी समन्वयक डॉ. ए. डी. जाधव, करवीर तहसीलदार, करवीर पंचायत समिती, बेलेचे सरपंच अर्चना लांबोरे व ग्रामसेविका प्रियांका पाटील यांच्यासह ग्राम पंचायत कार्यालयातील सर्वांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळत आहे.
कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील संगीता मस्के यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व शेतकऱ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. रेशीम उत्पादक तथा रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवक तानाजी पाटील हे या भागातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना या शेतीविषयी मार्गदर्शन व अनुदानासाठीची माहिती देत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे रेशीम उत्पादनातून प्रगती करणे साध्य होत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना कोष निर्मिती पासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही दिले जात आहे. तसेच नाबार्डकडून शिवाजी विद्यापीठा अंतर्गत बंगलूरु येथे ७ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन, किटक संगोपन (चॉकी सेंटर), धागा निर्मिती, (रेलींग सेंटर) शेतकऱ्यांच्या रेशीम बागांना भेटी आदी उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत झाली आहे. रेशीम उद्योगामुळे कमी गुंतवणुकीत, कमी वेळेत अधिक रक्कमेचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यामुळेच बेले गावातील रेशीम उत्पादक शेतकरी स्वत:सह कुटुंबाची व गावाची आर्थिक उन्नती साधत आहेत.