no images were found
झिका विषाणुमुळे होणा-या आजारासंबंधी महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर : इचलकरंजी शहरामध्ये झिका आजाराचे रुग्ण आढळल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने या आजारासंबंधी युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केली आहे. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार आहे. याची लक्षणे डेंग्यू आजार सारखीच असून या आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. झिका आजार पसरवणारा डास हा स्वच्छ पाण्यात तयार होतो आणि तो दिवसा चावतो. या आजारामुळे मृत्यू चे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे या आजाराबाबत नागरीकांनी घाबरुन न जाता वेळेवर उपाययोजना केल्यास धोका टाळता येतो. झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजार सारखीच आहेत. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी इत्यादी लक्षणे आहेत.
या आजाराच्या उपचारासाठी रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी, शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे, तापाकरीता पॅरासिटामॉल औषध वापरावे, ॲस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करु नये व गरोदर महिलांनी विशेष दक्षता घ्यावी. या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये व घरच्या आजुबाजूस सांडपाणी व कचरा साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, घरामध्ये वापरासाठी भरुन ठेवलेले पाण्याचे कंटेनर नीट झाकून ठेवण्यात यावेत, पाण्याचे कंटेनर व भांडी आठवडयातून एक वेळा कोरडी करुन घासून-पुसून स्वच्छ ठेवावीत. एक दिवसा कोरडा दिवस पाळावा, डासांपासुन संरक्षणासाठी लांब हाताचे व पाय घोळ कपडे वापरावेत, नारळाच्या करवंटया, टायर, यांची वेळीच विल्हेवाट लावावी व फ्रिजच्या मागील जाळया स्वच्छ ठेवाव्यात तसेच झाडांच्या कुंडयामध्ये पाणी साचु देऊ नये, याप्रमाणे लक्षणे असलेल्या संशयित तापाच्या रुग्णांनी महापालिकेच्या नजिकच्या दवाखान्याशी अथवा रुग्णालयाशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.