no images were found
मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो; शरद पवारांचा दिलीप वळसे-पाटील यांना प्रतिउत्तर
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे-पाटील यांनी थेट शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावरून बरीच प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आलं. त्याच विधानावरून शरद पवारांनी दिलीप वळसे-पाटील यांनाच लक्ष्य केलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांना स्वबळावर सत्ता आणता आली नाही, अशा आशयाचं विधान केलं होतं. “शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते”, असं वळसे पाटील म्हणाले होते. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना वळसे पाटील यांनी सारवासारव केल्याचं दिसून आलं.
“मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळा काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. ती आम्ही जिंकली. बहुमत आलं. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचं?” असा खोचक प्रश्नच शरद पवारांनी उपस्थित केला आहे.