no images were found
लोकनिधीतून साकारणार विद्यार्थिनी वसतिगृह; शिवाजी विद्यापीठाचा अभिनव उपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची वसतिगृहाअभावी राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी विद्यापीठाने लोकसहभागातून लोकांच्याच स्मृती जतन करू शकेल, अशा वसतिगृहाची संकल्पना समोर आणली आहे. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेची मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली. काही देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे असा निधी देण्याची तयारी दर्शविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संकल्पनेविषयी तपशीलवार माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, लोकांचा सहभाग ही यामागील मुख्य कल्पना आहे. त्यानुसार लोकांनी आपले प्रिय कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यायचा आणि त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करायची, अशी ही कल्पना आहे. ही योजना सर्वांसाठी खुली असून आपल्या प्रियजनांची आठवण जागती ठेवण्याची ही एक संधी आहे.
ही योजना सध्या प्रस्तावित असून या वसतिगृहात २०० विद्यार्थिनींची राहण्याची सोय होईल. सध्याचा बांधकामाचा दर लक्षात घेता प्रती विद्यार्थिनी किमान रु. ३.२५ लक्ष इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एका व्यक्तीने / संस्थेने एक किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थिनींसाठीचा खर्च उचलल्यास त्या खोलीला त्या व्यक्ती / संस्था यांनी ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी दिली आहे, त्या व्यक्तीचे नाव देण्यात येईल. या देणगीमधून उभ्या राहणाऱ्या वसतिगृहातील एका खोलीला बाहेरील बाजूस देणगीदाराचे नाव आणि देणगीदाराने सुचवलेल्या व्यक्तीचे नाव अशा मजकुराची पाटी लावली जाईल. देणगीदारास 80 G अंतर्गत प्राप्तिकर लाभ प्रमाणपत्र दिले जाईल.
ज्या देणगीदारांना अधिक देणगी द्यावयाची इच्छा असेल, त्यांनी भोजनालय, सभागृह, ग्रंथालय किंवा संगणक कक्ष अशा सुविधांसाठी द्यावी. जेणेकरून भविष्यकाळामध्ये ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना वर्षानुवर्षे सुविधा निर्माण होईल. या बाबतची सविस्तर माहिती अभियांत्रिकी विभागात उपलब्ध करण्यात येत असल्याचेही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
या योजनेसाठी निधी संकलित करीत असताना फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वर देणगी स्वीकारली जाईल. सदर योजनेमध्ये अधिकार मंडळाच्या मान्यतेने वेळोवेळी केलेले बदल लागू राहतील. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला अर्ज करणे आवश्यक असेल.