no images were found
“राणी मी होणार” सोनी मराठीवर
कोल्हापूर : सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन विषयांवरील मालिका घेऊन येत असते. सोनी मराठी वाहिनीने नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या मालिकांमध्ये स्थान दिले आहे. आता सोनी मराठी ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. एका सर्वसाधारण घरातील मुलीची ही कथा असून तिच्या स्वप्नांची उमेद आयुष्य बदलणार का ? हे पाहणं उत्कंठा वर्धक ठरणार आहे. ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे.
आपला होणारा नवरा श्रीमंत असावा, जो आपली सगळी स्वप्न पूर्ण करेल अन् आपल्याला राणी सारखं ठेवेल, असं वाटणारी मीरा आणि मीराच्या प्रेमात पडलेला मल्हार अशा दोघांची गोष्ट म्हणजे ‘राणी मी होणार’. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसई शहरात ही गोष्ट घडते. या मालिकेत संचिता कुळकर्णी आणि सिद्धार्थ खिरीड हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. संचिता ने मीरा ही व्यक्तिरेखा साकारली आहे तर अभिनेता सिद्धार्थ खिरीड मल्हार च्या भूमिकेत दिसणार आहे. मीरा आणि मल्हार दोघेही सर्वसाधारण घरातील असून वसईतील एका सलॉनमध्ये मीरा आणि मल्हार एकत्र काम करत असतात. मीरा नेल आर्टिस्ट आहे तर मल्हार हेअर स्टायलिस्ट आहे. मल्हार आपल्या कामात परफेक्ट असण्याबरोबरच सर्वांना आपलेलसे करून घेण्याचा त्याचा स्वभाव आहे, यामुळे सलॉन मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचा तो लाडका आहे.
वसई सारख्या निमशहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मीरा आणि मल्हार एकत्र काम करत असले तरी त्यांची स्वप्ने वेगळी आहेत. मल्हारला मीरा आवडते पण मीराला श्रीमंत घरातील मुलाशी लग्न करून झटपट श्रीमंत व्हायचं आहे. या दोघांच्या प्रेम काहाणीचा हटके प्रवास ‘राणी मी होणार’ या सोनी मराठीवरील मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘राणी मी होणार’ या मालिकेत संचिता कुळकर्णी आणि सिद्धार्थ खिरीड या दोघांसोबत विजय मिश्रा,पूर्णिमा तळवलकर, चिन्मय शिंत्रे, गौरी किरण, स्वाती देवल, संजय कुलकर्णी, उषा नाईक अशी सह कलाकारांची देखील एक चांगली फळी या मालिकेत आहे. आयरीस प्रोडक्शन निर्मित सोनी मराठीवरील “राणी मी होणार’ या मालिकेत मीराच्या स्वप्नांकडची धाव, घेऊ शकेल का मल्हारच्या मनाचा ठाव? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सोनी मराठीवर नवी मालिका – ‘राणी मी होणार’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता.