
no images were found
उभं पीक उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या
भंडारा : मागील काही दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी शेती पिक उध्वस्त झाली. त्यात सलग तीनदा पुराचा फटका बसून शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गोविंदराव महादेव दाणी (६७), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गोविंदराव दाणी यांच्याकडे किन्ही गुंजेपार शिवारात सहा एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली होती. मात्र, मागील जुलै व ऑगस्ट महिन्यांत तालुक्यातील पावसाने तब्बल तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे गोविंदराव यांच्या शेतातील पीक तीनदा पाण्याखाली आले आणि त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
अखेर या तणावातच ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घरातील सदस्य झोपेत असताना आपल्या शेतात निघून गेले. याठिकाणी त्यांनी आंब्याच्या झाडाला नायलॉन दोर बांधून गळफास घेतला आणि आपला जीवनप्रवास संपवला.सकाळ झाल्यावर त्यांचा मुलगा शेतात गेला होता. यावेळी त्याला त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले आणि यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.