no images were found
महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात
कोल्हापूर (प्रतिनिधी ) :- अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणी पोदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या सहकार्याने चेस असोसिएशन कोल्हापूर ने महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.स्पर्धा समितीच्या अध्यक्षा व पोदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या शिल्पा कपूर,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले व मुख्य स्पर्धा संचालक मनिष मारुलकर,समन्वयक धीरज वैद्य,आरती मोदी,पोदार स्कूलच्या उप प्राचार्या मनिषा आमराळे व्यवस्थापक सुरेश देसाई व क्रीडा समन्वयक संजय चिले यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली.
25 ते 27 ऑगस्ट 2023 दरम्यान तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.स्विस् लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात होणाऱ्या या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साधारण 150 बुद्धिबळपटू सहभागी होतील असा अंदाज आहे.या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली आहे,त्यांना स्थानिक कोल्हापूरचे करण परीट,आरती मोदी सूर्याजी भोसले व रोहित पोळ सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करणार आहेत. 1 जानेवारी 2016 किंवा त्यानंतर जन्मलेली महाराष्ट्रातील मुले-मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. दोन्ही गटातून पहिल्या दहा क्रमांकांना एकूण वीस हजार रुपयांची रोख बक्षिसे व चषक दिले जाणार आहेत.मुलांच्या गटातून दोन मुलांची व मुलींच्या गटातून दोन मुलींची निवड सात वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात करण्यात येणार आहे.सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धा कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना आठशे रुपये प्रवेश शुल्क आहे तर जिल्ह्यातून निवड न झालेल्या खेळाडूंना पंधराशे रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे तरी इच्छुक महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंनी आपली नावे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदवावीत. https://mcachess.in/Tournament_Registration/Registration/registration_form.php
अधिक माहितीसाठी भरत चौगुले, मनिष मारुलकर,धीरज वैद्य, प्रितम घोडके,उत्कर्ष लोमटे यांच्याशीं संपर्क साधावा.