no images were found
“न्यू पॉलिटेक्निकची ४० वर्षांची देदीप्यमान वाटचाल अभिमानास्पद” – पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी ): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे व सर्व स्टाफच्या उपस्थितीत संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांच्या हस्ते केक कापून व आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी प्रस्तावना करताना न्यू पॉलिटेक्निकची स्थापनेपासून ते आतापर्यंतची वाटचाल विशद केली. रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील यांनी न्यू पॉलिटेक्निकच्या या वाटचालीत आपण ३२ वर्षे खारीचा वाटा उचलु शकलो याचा आनंद व समाधान आहे, असे नमुद केले. प्रा. वैभव पाटणकर यांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक मनोगतामध्ये आपण विद्यार्थी म्हणून इथे घडल्याचा अभिमान व्यक्त केला.
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे मनोगतात म्हणाले की तीन कोर्सेसनी सुरू झालेल्या न्यू पॉलिटेक्निकमध्ये आज प्रमुख सहा कोर्सेससोबत अल्पमुदतीचे ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग ॲन्ड डेकोरेशन, मल्टीस्किल टेक्निशियन हे कोर्सेस उपलब्ध आहेत. केंद्र शासनाचे इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिल आणि एमसीईडीचे अधिकृत विभागीय केंद्र इथे कार्यान्वित आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार व संस्कार, मातृसंस्था ‘प्रिन्स शिवाजी’ चे पाठबळ आणि न्यू पॉलिटेक्निकच्या सुरूवातीपासूनच्या स्टाफचे बहुमोल कष्ट यामुळे ‘न्यू पॉलिटेक्निक’ हा जो तंत्रशिक्षणामध्ये ब्रॅण्ड निर्माण झाला आहे, तो आता तंत्रशिक्षणामध्ये एक बेंचमार्क म्हणून नावारूपास आणण्यास आपण कटिबद्ध आहोत.
चेअरमन के. जी. पाटील म्हणाले की ९ ऑगस्ट १९८३ रोजी क्रांतिदिनी संस्थेच्या शिवाजी पेठेतील प्रांगणात लावलेल्या न्यू पॉलिटेक्निक रूपी रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून इथे शिकलेल्या तब्बल ३८ बॅचेसमधील अभियंते विविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच विदेशातही आपली सेवा बजावत आहेत. सुरूवातीच्या बॅचेसमधील विद्यार्थ्यांची मुलेही इथून अभियंता झाली असून त्या काळातील प्राध्यापकांसोबत त्यांनी शिकवलेल्या तब्बल तीन पिढ्यांतील विद्यार्थीही एकाच वेळेस प्राध्यापक म्हणून इथे कार्यरत राहीले आहेत. त्यामुळेच विद्यार्थी व पालकांचा न्यू पॉलिटेक्निकवरील विश्वास कायम आहे.
यावेळी, वर्ष २०२२-२३ मध्ये विविध कार्यांद्वारे आपले बहुमोल योगदान देणारे कर्मचारी प्रा. उमेश पाटील व श्री. विकास आळवणे यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यू काॅलेज ऑफ फार्मसीच्या वतीने डाॅ. सचिन पिशवीकर व डाॅ. रविंद्र कुंभार यांनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना पुष्पगुच्छ देवून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. माधुरी पाटील यांनी केले, आभारप्रदर्शन विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी केले. यावेळी स्टाफ व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर चेअरमन के. जी. पाटील यांनी इलेक्ट्रीकल विभागाच्या नुतन संगणक कक्षाचे उद्घाटन केले.