no images were found
न्यायमूर्ती उदय लळीत यांचा देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी
दिल्ली : जस्टीस उदय उमेश लळीत यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी झाले आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. लळीत यांच्या नियुक्तीने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही उदय लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना असून या अगोदर 1971 मध्ये देशाचे 13 वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली होती. विजयदुर्गजवळचे गिर्ये गाव हे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव आहे. वकिली ही लळीतांच्या घराण्यात पिढीजात चालत आलेली आहे. मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. जून 1983 मध्ये न्यायाधीश उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. दिल्लीत येण्यापूर्वी उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. सुमारे सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्ष लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत. 80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी ‘2G स्पेक्ट्रम’ हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालविला होता. 2G स्पेक्ट्रम घोटाळा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला त्यावेळी केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणाच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी, केंद्र सरकारने घेतलेले आक्षेप झुगारुन सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या विश्वासाने जेष्ठ वकील उदय लळीत यांच्यावर टाकली. अशा अनेक केसेसमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे.