no images were found
कृष्ण – रुक्मिणी मातेच्या विवाहास लोटला भक्तगण
कोल्हापूर, – श्रीमद भागवत सांगते सुखी जीवनाचे सार, अशा शब्दांत निरुपण मयूर कुलकर्णी यांनी केले तर कृष्ण-रुक्मिणी मातेच्या विवाहास अशरक्षः भक्तगण लोटला.श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहामध्ये आज पाचवे पुष्प अर्पण करण्यात आले. यानिमित्त आज मोठेपणीचा कृष्ण याचे सुंदर निरूपण झाले. यामध्ये श्रीकृष्णाचे गोवर्धन उद्धार ज्यामधून कृष्णाने पर्यावरणाबद्दलची जागरूकता तसेच कर्मकांडांचे छेदन हजारो वर्षांपूर्वी केले, याचे निरूपण झाले. यानंतर कृष्णाच्या अदभुत सुंदर कलांनी नटलेला रासलीलेचा कथा भाग उलगडून सांगण्यात आला. कृष्ण हाच आनंदाची रास आहे आणि तो आनंद उधळणे हेच श्रीकृष्णाचे काम आहे.यानंतर श्रीकृष्णाच्या बाललीला संपून आता कर्तव्याकडे भगवान वळत आहेत, ज्यामध्ये कृष्णाचे मथुरा गमन आणि कंसाचा वध, त्यामागील तात्पर्य इत्यादीवर गुरुजीनी उदाहरणासह मार्गदर्शन केले. श्रीकृष्णाचे गुरुगृही गमन याचे निरूपण झाले. जगद्गुरू असणाऱ्या कृष्णानेही शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवले. यानंतर जरासंधाचे आक्रमण कालयवनाचा वध यातून दुष्ट कितीही मोठा असला तरीही धर्माचाच जय होतो हे पटवून दिले.
दरम्यान, सायंकाळी सात वाजता विलोभनीय असा श्रीकृष्ण विवाहाचा प्रसंग लक्ष्मीनारायण मंदिर येथे थाटामाटात संपन्न झाला. यामध्ये सुंदर फुलांची सजावट, लग्न वेदी, सुंदर नटलेले राधाकृष्ण, रुखवत, वरात, थाटात स्वागत, वैदिक मंत्रांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होऊन आरती झाली.