no images were found
१२ हजार कोटी रुपयांच्या वर शेतकऱ्यांना मदत :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई :- गोगलगाईमुळे झालेल्या नुकसानापोटी ९८ कोटी दिले आहेत. १२ हजार कोटी रुपयांच्या वर शेतकऱ्यांना मदत केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक घोषणा केल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीत २१ लाख हेक्टर जमीन बाधित झाली. नुकसानीसाठी १,५०० कोटी तरतूद केली, युद्धपातळीवर पंचनामे झाले.या आधीच्या नुकसानीपोटी सात हजार कोटींचा निधी दिला आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४१ हजार कोटी रुपये एवढ्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. एसटी महामंडळ, वृद्धांसाठी ज्या योजना आहेत, त्यासाठी वाढीव मदत दिल्याने पुरवणी मागण्यांचा आकडा वाढल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विधानसभेत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार गैरहजर होते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, सर्व आमदारांची उपस्थित ८५ टक्के होती. याचा अर्थ आमचे आमदारही उपस्थित होते. माझ्याबरोबर किती आमदार आहेत तो आकडा मी सांगणार नाही, तुम्हाला मला संभ्रमात ठेवायचे आहे, अशी फिरकीही त्यांनी यावेळी घेतली.
उद्योगांवरील श्वेतपत्रिकेचा उल्लेख विरोधकांनी काळी पत्रिका केल्याचे विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते. या राज्याला उद्योजक प्राधान्य देत आहेत, परदेशी गुंतवणूक वाढत आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.