
no images were found
इचलकरंजीला पाणी देण्याच्या योजनेबाबतचे म्हणणे शासनाकडे मांडू – राहुल रेखावार
कोल्हापूर : दूधगंगा नदीवर सुळकूड येथून इचलकरंजीला पाणी देण्याची योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दूधगंगा व वेदगंगा काठावरील शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी यांनी या योजनेस विरोध दर्शविला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध लोकप्रतिनिधी व संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी उपस्थित शेतकरी व लोकप्रतिनिधींना दूधगंगा नदीवर सुळकुड येथून इचलकरंजीला पाणी देण्याच्या योजनेबाबतचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले.
यावेळी बैठकीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, विरेंद्र मंडलिक, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे , कार्यकारी अभियंता स्मिता माने व दूधगंगा, वेदगंगा बचाव समितीचे शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी दूधगंगा योजनेद्वारे इचलकरंजीला पाणी न देण्याबाबतचे आपले म्हणणे मांडले. शासनाकडून तात्काळ सदर योजना आहे त्या स्थितीत बंद करण्यासाठीही मागणी सर्व स्तरावरुन यावेळेस करण्यात आली. याबाबतचे लेखी निवेदन लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी रेखावर यांच्याकडे सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपण सर्वांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचवू, आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत हे लक्षात येत आहे, शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने या विषयाबाबत कोणाचेही नुकसान होणार नाही असे निर्णय राज्यस्तरावरुन घेण्यासाठी प्रस्ताव पाठवू असे आश्वासन दिले. या योजनेचा निर्णय शासन स्तरावरुन झाल्यामुळे आता त्या ठिकाणाहूनच याबाबतचा पुढील निर्णय येईल असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.