no images were found
नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तारुणाचे शिरवळ येथून अपहरण; टोळी जेरबंद
इस्लामपूर : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्या शिरवळ येथील संशयिताचे आठजणांनी अपहरण केले. त्याच्याविरोधात मिरज ग्रामीण, शिराळा पोलिस ठाण्यासह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
गुरुवारी रात्री पेठनाका येथे इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून त्या टोळीला जेरबंद केले. रोहित प्रतापराव नलवडे (36, रा. शिराळा), प्रताप संपत सावंत (42), उमेश वसंत सावंत (34), राकेश सुधाकर गंवडी (28, तिघे रा. काळमवाडी, ता. वाळवा), रोहित सर्जेराव पाटील 29), अक्षय मोहन गायकवाड (28, दोघे रा. येलूर, ता. वाळवा), पोपट महादेव शिंदे (वय 33, रा. पाडळी, ता. शिराळा), मनोज महादेव पाटील (28, रा. मांगले, ता. शिराळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन कार (किंमत 23 लाख रुपये) ताब्यात घेतल्या आहेत.
संशयित राकेश, रोहित, अक्षय, पोपट आदींना संशयित बाबासो कुंभार याने नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातला होता. तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी सायंकाळी शिरवळ येथील भर वस्तीतून बाबासाहेब कुंभार याचे फिल्मी स्टाईलने टोळीने अपहरण केले. कुंभार याच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली होती.
ज्यांनी अपहरण केले त्यांच्याकडून, त्यांच्या नातेवाईकांच्याकडून कुंभार याने नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात कुंभार याच्याविरोधात नोकरीच्या आमिषाने 90 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच शिराळा येथे 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबासो कुंभार याला मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुंभार याचे आणखी कारनामे समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.