Home राजकीय आपला देश युवांचा आहे  – राज्यपाल रमेश बैस

आपला देश युवांचा आहे  – राज्यपाल रमेश बैस

38 second read
0
0
23

no images were found

आपला देश युवांचा आहे  राज्यपाल रमेश बैस

 

  मुंबई :- आपला देश युवांचा आहे. जर्मनी, इटली हे देश कुशल मनुष्यबळासाठी प्रयत्नशील असूनही त्यांना उपलब्ध होत नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानंतर विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रातील प्रशिक्षण, कौशल्य प्राप्त करून घेता येणार असल्याने टीम लीडर, प्रवर्तक बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

           देशभरात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने शैक्षणिक धोरणात बदल केले असून संशोधन, कौशल्य विकसित आणि उद्योजक तयार होणारे धोरण तयार केले आहे. यामुळे युवकांनी खासगी किंवा सरकारी नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनावे आसही राज्यपाल बैस त्यांनी सांगितले.    

          विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारावीत, बदल स्वीकारावेत,  मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची तयारी ठेवावी. गुणात्मक अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. प्रत्येक विद्यापीठानेही चांगले शिक्षक तयार करावेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शिक्षण प्रकल्प राबवित विद्यापीठ समृद्ध आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्न करावेत.

            विद्यापीठानेही आपल्या उणिवा शोधून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. देशभरातील विद्यापीठांत समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत हे विद्यापीठ निश्चितच चांगले विद्यार्थी घडवित आहे. विविध महनीय व्यक्ती, कलाकार, उद्योगपती, राजकारणी या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयात तयार झाले आहेत, याची विद्यापीठाला पुढे नेण्यात नक्कीच मदत होणार आहे, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.  

            डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी माजी खासदार, भारतीय सांस्कृतिक संबध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. युवराज मलघे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक विजया येवले आदींसह राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

             माजी खासदार डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, ते सुद्धा याच विद्यापीठाचा विद्यार्थी आहेत. वैश्विकीकरणामुळे आपल्या समोर विविध आव्हाने आहेत मात्र, आव्हानांना न घाबरता, हतबल न होता सामोरे जावे. भारतात सर्व भाषा बोलल्या जात असूनही वैश्विक सुंदरता आहे. उच्च व तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण इतर देशांशी जोडले जात आहोत. यामुळे शिक्षणामध्ये जागतिक पातळीवर आदान-प्रदान होत आहे. त्यामुळे विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा यांचे संस्कार घ्यावेत, आपले मन आणि ताकदीच्या जोरावर ज्ञानाची पातळी वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

            कुलगुरू डॉ. कामत यांनी विद्यापीठाची माहिती दिली. घटक महाविद्यालयांमुळे औद्योगिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्ञानाची भर विद्यार्थ्यांना मिळत आहे. महिला सशक्तीकरण, क्रीडा व्यवस्थापन, प्रशिक्षण यामध्येही विद्यापीठ अग्रेसर आहे. संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाला चार पेटंट मिळाले असून येणाऱ्या काळात टी-२० मिनी लिग सामने भरविण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. कामत यांनी सांगितले.

           प्रारंभी राज्यपाल बैस यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व्यवस्थापन, मानविकी, आंतरविद्या शास्त्रीय विभागातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि इतर पदवी प्रदान करण्यात आली. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…