
no images were found
‘सा रे ग म पा’च्या नव्या उत्कंठावर्धक आवृत्तीत परीक्षक म्हणून दिसणार हिमेश रेशमिया
गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म पा, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे काही वास्तववादी कार्यक्रम सादर केले. अंगच्या कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर झालेच, पण ते आजही तितकेच लोकप्रिय असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे. गतवर्षीच्या ‘सा रे ग म पा लिटल चॅम्प्स’च्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म पा’ हा आयकॉनिक कार्यक्रम देशातील होतकरू गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी देण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.
आता ही आवृत्ती अधिक रोचक करण्यासाठी तसेच इच्छुक स्पर्धकांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी झी टीव्हीने नामवंत संगीतकार, गायक, गीतकार आणि निर्माता हिमेश रेशमिया याचा ‘सा रे ग म पा 2023’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून समावेश केला आहे. हिमेश रेशमिया हा आजवरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये एक लोकप्रिय परीक्षक म्हणून ओळखला जातो. तो आता या कार्यक्रमासाठी सहाव्यांदा परीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यामुळे तो ‘सा रे ग म प’ कार्यक्रमातील सर्वाधिक काळ परीक्षकाचे काम पाहणारा परीक्षक ठरला आहे. रेशमियाने आजवर तेरा सुरूर, आप की कशीश आणि मुझको याद सताए तेरी यासारखी काही अत्यंत लोकप्रिय गीते संगीत क्षेत्राला दिली आहेत. आता तो पुन्हा एकदा नव्या होतकरू स्पर्धकांमधून उमेदवार निवडण्यास आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यास सज्ज झाला आहे.